श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरातील जीवना कोळीवाडा परिसरात अत्यंत जुने असे जीवना बंदर आहे . सध्याच्या नविन भाषेत जेट्टी म्हणतात . १९६८ सालापर्यंत श्रीवर्धनला येण्यासाठी रस्ते वाहतूक आस्तित्वात नव्हती . कारण आता असलेला साई मोरबा रस्ता तेव्हा नव्हता . गोरेगावच्या नदीवर पुल नसल्यामुळे तेथुन होडीने पलीकडे यावे लागत असे . तेथे आल्यावर खाजगी वाहन मिळाले तर ठिक नाहीतर बैलगाडी किंवा पायी जाण्याशिवाय पर्याय नसे . त्यामुळे मुंबईला जाणारे किंवा येणारे प्रवासी जलमार्गानि येणे पसंत करीत असत . त्यावेळी मुंबई भाऊचा धक्का येथुन बोट गोव्यापर्यंत चालत असे ती बोट मुरुड , श्रीवर्धन हर्णे , रत्नागिरी या बंदरात थांबून प्रवासी चढ उतार करीत असे . प्रवाशांसोबत मालाची वाहतूक सुद्धा बोटीने होत असे . श्रीवर्धन हे त्यावेळी मुख्य बंदर म्हणून प्रसिध्द होते पण रस्ते वाहतूक सुरू झाल्यानंतर या बंदराचा वापर मासळी उतरविण्यासाठी होवू लागला . मच्छिमारी करणाच्या बोटी या ठिकाणाहून ये - जा करतात ओहोटीच्या वेळी या ठिकाणी खोल पाण्यात असलेला एकच धक्का उपयोगात येतो . भरतीच्या वेळी तीन चार ठिकाणी बोटी उभ्या करता येतात . आज मुंबई गोवा महामार्गावर वाढलेला वाहतुकीचा प्रचंड ताण पाहता जलमागनेि प्रवासी व मालवाहतूक जलद स्वस्त व फायदेशीर ठरणार आहे भविष्यात पर्यटन वाढीसाठी जलवाहतूक पर्यटकांना आनंददायी व आकर्षक ठरणार हे निश्चित . परंतु श्रीवर्धनचे जीवना बंदर सध्या तरी चांगल्या अवस्थेत नसल्याचे पाहायला मिळत आहे . महाराष्ट्र मेरीटाइम बोडकडून दुरुस्तीचे थातुरमातुर काम केले जाते पण ते कायमस्वरूपी टीकत नसल्याने पुन्हा बंदरांची अवस्था जैसेथे होते . श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून येण्याअगोदर पालकमंत्री असताना व निवडून आल्यानंतर सुनील तटकरेनी जीवना बंदराच्या विकासासाठी निधी देणार असल्याच्या घोषणा केल्या पण आजपर्यंत कोणताही मोठा निधी बंदर विकास व नूतनीकरण करण्यासाठी मिळालेला नाही . जीवना बंदर कडे जाण्याआधी स्वयंभु जीवनेश्वर हे शंकराचे मंदिर आहे त्यावरूनच या बंदराला जीवना बंदर हे नाव पडल्याचे सांगितले जाते श्रीवर्धन तालुका सध्या पर्यटनस्थळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शहरात प्रसिध्द आहे श्रीवर्धन येथे पर्यटनासोबत मच्छिमारी मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून तसेच मच्छिमारी व्यवसायाला अजुन चालना मिळण्यासाठी जीवना बंदराचा विकास होणे काळाची गरज आहे . सध्या या बंदरातून सागरी गस्ती साठी जाणार्या पोलिसांच्या स्पीडबोट देखिल ये जा करत असतात . भविष्यात बागमांडले ते बाणकोट हा भव्य पुल वाहतूकीसाठी खुला होणार असल्याने तालुक्याचे महत्त्व जास्तीच वाढणार आहे

Post a Comment