श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली : पर्यटनावर आधारीत असलेले व्यवसाय मंदीच्या छायेत
श्रीवर्धन : संतोष चौकर
या वर्षी सुट्ट्यांचा मोसम सुरु होऊन सुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत या वर्ष पर्यटकांची संख्या कमी झाल्याने पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसाय मंदीच्या छायेत असल्याचे पहायला मिळत आहेत . सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये अद्याप परीक्षा संपल्या नसल्यामुळे देखील हा परिणाम जाणवत आहे इंधनाचे वाढलेले दर , महागाई , कडक उन्हाळा या मुळे सुद्धा येणार्या पर्यटकांची संख्या घटल्याचे बोलले जात आहे दिघी आगरदांडा फेरीबोट सेवा सुरु झाल्यामुळे मुंबईच्या पर्यटकांना श्रीवर्धन दिवेआगर हरिहरेश्वर जवळ पडणार आहे तसेच प्रवासाचे अंतर सुद्धा कमी होणार आहे या अगोदर श्रीवर्धन तालुक्यात पुणे जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असत . परंतु आता मुंबई , ठाणे नाशिक या ठिकाणचे पर्यटक दिवाळीच्या सुट्टीत आले होते . या वर्षी रविवारला जोडुन खूप सुट्ट्या आल्या आहेत , त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना चांगला धंदा होण्याची आशा आहे . श्रीवर्धन तालुक्यातील बहुसंख्य व्यवसाय मच्छिमारी व पर्यटनावर अवलंबून आहेत . ओखी चक्रीवादळ होऊन गेल्यानंतर सर्वत्र मच्छिचा दुष्काळ असल्याचेच चित्र आहे . त्याचा परिणाम बाजारातील व्यवहारात दिसून येतो . मच्छिमारी व पर्यटन हे दोन्ही व्यवसाय मंदीत आल्यामुळे व्यावसायिक संकटात सापडले आहेत . लॉज , हॉटेल रिसॉर्ट , घरगुती खाणावळ, रिक्षा , किराणा व्यापारी , कोकणी विक्रेते , आंबा विक्रेते , समुद्रकिनारी अनेक छोटे मोठे व्यवसाय करणारे या सर्व घटकांवर मंदीचे सावट आहे . मे महिन्यात पर्यटकांची संख्या वाढून धंदा वाढेल अशी अपेक्षा सर्व व्यावसायिकांना वाटत आहे कारण महिन्याच्या आगाऊ बुकिंग साठी सुरुवात झाली आहे . संपूर्ण मे महिना आणि जुन महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत जरी पर्यटक चांगले आले तरी एप्रिल महिन्यात कमी झालेल्या धंद्याची तुट भरून काढता येईल असा विश्वास व्यावसायिकांना आहे . श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसाय असलेल्या गावात पाणी टंचाई होत नसल्यामुळे व्यावसायिक खुश आहेत .

Post a Comment