म्हसळा : खरसई येथे दोन एस.टी. बस समोरा समोर धडकून गंभीर अपघात ,बस चालकासह तीन गंभीर तर पाच किरकोळ जखमी


म्हसळा : खरसई येथे दोन एस.टी. बस समोरा समोर धडकून गंभीर अपघात  ,बस चालकासह तीन गंभीर तर पाच किरकोळ जखमी, म्हसळा – दिघी – दिवेआगर कडे जाणारी वाहतूक दोन तास खोळंबली 

म्हसळा : सुशील यादव 

म्हसळा तालुक्यातील खरसई जवळ एका अवघड वळणावर दोन एस टी बस ची सामोरा समोर धडक होऊन शनि . दि. २८ एप्रिल रोजी दुपारी २.०० च्या सुमारास गंभीर अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की दोनही बस एकमेकांनमध्ये अडकून राहिल्या होत्या. या भीषण अपघातात एस.टी. बस च्या चालकासह तीन प्रवासी गंभीर जखमी असून पाच प्रवाश्याना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या लगीनसराई चा हंगाम सुरु असल्याने व येणाऱ्या सलग चार दिवस सुट्यांमुळे श्रीवर्धन आगाराकडून मुंबई, नालासोपारा, बोरीवली कडे जादा बसेस सोडल्या जात आहेत यातीलच एक एस.टी. ची जादा बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. ४९०९ हि नालासोपारा  हुन श्रीवर्धन कडे येत होती तर त्याच वेळेस श्रीवर्धन हून नालासोपारा कडे जाणारी एस.टी. बस क्रमांक एम.एच.१४ बी.टी. ३२९५ खरसई जवळील एका अवघड वळणावर आली असता नालासोपारा – श्रीवर्धन बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या श्रीवर्धन – बोर्ली – नालासोपारा या बसच्या मध्यभागी जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की नालासोपारा- श्रीवर्धन बस ची संपूर्ण केबिन श्रीवर्धन-बोर्ली-नालासोपारा बस च्या मध्यभागी घुसली होती. या भीषण अपघातात नालासोपारा-श्रीवर्धन बस चा चालक गोविंद गुट्टे याच्या उजवा पाय व उजवा हात गंभीर जखमी झाला आहे तर कुंदा बळीराम मोरे(वय. ५० वर्षे), रा. आदगाव यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा मुलगा सुरेश बळीराम मोरे(वय. २५ वर्षे) याच्या छातीवर मार लागला आहे, सुनील अनंत गायकर(वय ३६ वर्षे) याच्या डोक्याला मार लागून उजवा हात व उजवा पाय जायबंदी झाला आहे. या सर्वांना म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथोमचार करून पुढील उपचारासाठी माणगाव , मुंबई , अन्यत्र हलविण्यात आले आहे .तर किरकोळ जखमी मध्ये १. शर्मिला संजय म्हात्रे(वय २५ वर्षे) रा. खारगाव खु., २. समिता राकेश कांबळे(वय २५ वर्षे) खारगाव खु. , ३. सुमित्रा परशुराम बुधे (वय ६० वर्षे) रा. बनोटी, ४.प्रशांत मनोहर जाधव(वय ४० वर्षे)  शिरवणे, ५. डी. जे. देवकाते ,श्रीवर्धन – नालासोपारां एस.टी.बस चा चालक हे पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघाताची खबर मिळताच म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उप निरीक्षक ढूस यांच्यासाहित पोलीस कर्मचारी घटना स्थळी काही वेळेतच हजर झाले व जखमींना वेळेत बाहेर काढल्याने जिवीत हानी टळली .

 दोनही एस.टी. बस म्हसळा – दिघी मार्गाच्या मधोमध अपघातग्रस्त झाल्याने म्हसळा येथून दिघी, दिवेआगर कडे येणारी-जाणारी वाहने तब्बल दोन तास अडकून पडली. मार्गाच्या दुतर्फा काही किलोमिटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . बस एकमेकांपासून वेगळ्या करण्या करिता जे.सी.बी. चा वापर करावा लागला. त्यानंतर या मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली.      

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा