श्रीवर्धन तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ; आरोग्य व पोलीसांनी संयुक्त कारवाई करण्याची मागणी


श्रीवर्धन तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
आरोग्य व पोलीसांनी संयुक्त कारवाई करण्याची मागणी

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरु असताना आरोग्य विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.

श्रीवर्धन तालुक्यात जवळपास दीडशे गाव खेडी असून, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात उष्माघात, ताप यांसह इतर आजाराने ग्रासले आहे. ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तथा उपकेंद्रात डॉक्टरांच्या अनुपस्थिती मुळे गरीब रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत, तर तर खाजगी रुग्णालयात भरमसाठ लुटमार सुरू असते परिणामी, शासनाने गरिबांसाठी ग्रामीण भागात सुरु केलेले सरकारी रुग्णालये ओस पडत आहेत. याचाच फायदा घेऊन भरडखोल, दिघी, बोर्लीपंचतन, काळसुरी, आदगाव , वडवली परीसरामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे. 

 शहरातील नामवंत डॉक्टरांच्या हाताखाली दोन ते ३ वर्ष कम्पाउंडरची नोकरी करून त्यानंतर हेच कम्पाउंडर ग्रामीण भागात जाऊन डॉक्टरी व्यवसाय करतात, तसेच काही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेले मात्र नियमानुसार नसलेले बोगस प्रमाणपत्र घेऊन ग्रामीण भागात आपला डॉक्टरचा व्यवसाय करताना दिसून येत आहेत. या बोगस व्यवसायापासून आर्थिक कमाई होत असली, तरी अशा बेकायदेशीर उपचारामुळे गोरगरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरात जाऊन महागडा उपचार घेण्यापेक्षा जर गावातच कमी पैशात उपचार होत असल्याने अशिक्षित गोरगरीब गावातच उपचार घेतात; मात्र अनेक वेळा चुकीचा उपचार होऊन त्या रुग्णांवर विपरित परिणाम होतो व नंतर त्या रुग्णाला शहरात जाऊन महागड्या दवाखान्यात इलाज करावा लागतो. बोगस डॉक्टरांचा हा व्यवसाय जवळपास सर्वच खेडेगावात चालत आहे.

परंतु त्या-त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर लोकप्रतिनिधी काहीच बोलायला तयार नसतात. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्यांची चांगली सुविधा मिळावी, त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत, यासाठी शासनाकडून ग्रामीण भागात सरकारी रुग्णालये सुरु करण्यात आली आहेत, तर त्या रुग्णालयांवर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांवर व रुग्णालयावर शासनाचे दरमहा लाखो रुपये खर्च होतात, तसेच कोट्यवधी रुपयांच्या औषधांचा पुरवठा केला जातो; मात्र याचा लाभ ग्रामीण रुग्णांना मिळत नाही. श्रीवर्धन तालुक्यात ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय सुरु असताना जिल्हा आरोग्य अधिकारी  गप्प का आहेत. कारवाई का करीत नाहीत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. एखाद्या सरकारी डॉक्टरने लाच मागितली तर त्याच्यावर तत्काळ कारवाई होते; मात्र दिवसाढवळ्या डॉक्टरचा बोगस व्यवसाय सुरु असताना कारवाईच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे, त्यामुळे गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई न करणाऱ्या वर कारवाई कधी होणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तालुक्यातील नामवंत खासगी दवाखान्यामध्ये अशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा दिसत आहे.सध्या तालुक्यात तसेच बोर्लीपंचतन मध्ये अनेक मोठ-मोठे खासगी रुग्णालय व मेटॅर्निटी होम आहेत. या रुग्णालयाच्या व्यवसायामध्ये जणू काही डॉक्टरांची स्पर्धाच लागली आहे. या  शहरातील काही हॉस्पिटल व दवाखान्यामध्ये अशिक्षित मुला-मुलींचा भरणा असल्याने रूग्णांना इंजक्शन देणे, सलाईन लावण्याचे काम हेच अशिक्षित मुलं, मुली करतात; मात्र याचा रुग्णावर बरेचदा विपरित परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. वैद्यकीय व्यवसायाचे कोणतेच ज्ञान नसलेले हे कर्मचारी रुग्णांच्या जिवाशी खेळतात. तुटपुंज्या पगारावर डॉक्टर मंडळीसुद्धा त्यांचा वापर करून घेतात. यामध्ये हॉस्पिटल व दवाखान्याचा फायदा होत असला, तरी रुग्णांसाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे अशा दवाखान्याचीसुद्धा चौकशी करून अशा डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे आहे.सध्या श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरचा व्यवसाय सुरु आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरु आहे; मात्र वर्षातून एखाद्या वेळेस थातूरमातूर कारवाई होते व त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे ’ सुरु राहते; परंतु ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरचा व्यवसाय सुरु असताना नियमानुसार चालणारी मेडिकल असोसिएशन तथा डॉक्टर आवाज का उठवीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा