मुस्लिम युवकांकडून अशीही जनसेवा, अत्यल्प दरात देणार सुविधा
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
सामाजिक बांधिलकीच्या न्यायाने जनहितासाठीची बोर्लीपंचतन परिसरातील युवा वर्गाची वाटचाल अव्याहतपणे चालू आहे. या जाणिवेतून जनतेला झटपट आरोग्यसेवा मिळण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात 'युनिटी फेद फाउंडेशन' तर्फे एक रुग्णवाहिका घेण्यात आली . त्याचा लोकार्पण सोहळा बोर्लीपंचतन येथे संपन्न झाला.
विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील युवक वर्गाने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील गरज ओळखता युनिटी फाउंडेशन ने जनसेवा हेतू रुग्णवाहिका दिली. अशर पांगारकर, अन्सार चोगले, शाहिद उलडे, आरिफ अन्सारी, बासित पांगारकर, ताबिश पांगारकर, शब्बीर, जाशीम शेख, अल्ताफ खतीब, मुझफ्फर अलवारे आणि अल्ताफ मोकाशी अशा युवकांनी स्व वर्गणीतून रुग्णवाहिका भेट केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अन्सार चोगले यांनी सांगितले की, तालुक्यातील खाजगी किंवा बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. काही वेळा गंभीर आजारी रुग्ण अथवा तातडीच्या उपचारासाठी रुग्णाला श्रीवर्धन, माणगाव अथवा अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र येथील नादुरुस्त रुग्णवाहिकेचा प्रश्न अनेक वेळा समोर येतो. येथील ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेचे केलेली मागणी लक्षात घेता रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. असे असले तरी कोणीही ग्रामस्थ आजारी पडू नये व रुग्णवाहिकेचा वापरच न व्हावा हीच आपली प्रामाणिक भावना असल्याचे अन्सार यांनी सांगितले. अतीशय अत्यल्प दरात व जनसेवे च्या हेतूने ही रुग्णवाहिका उपलब्ध असेल असेही अन्सार चोगले यांनी स्पष्ट केले.

Post a Comment