बोर्ली - श्रीवर्धन रस्त्यावर संरक्षक कठडे नाही ; अपघाताची शक्यता...


बोर्ली - श्रीवर्धन रस्त्यावर संरक्षक कठडे नाही ; अपघाताची शक्यता 

श्रीवर्धन : प्रतिनिधी
बोर्ली - श्रीवर्धन रस्त्यावरील साईडपट्ट्यांची अवस्था प्रचंड खराब  झाली असून त्या खचत चालल्या आहेत . तर दुसरीकडे तीव्र उतारावरील वळणावर संरक्षक कठडे नसल्याने उतारावरून एखादी गाडी अंदाज चुकल्याने खोल खड्यात जाऊन अपघात होण्याची भिती वाढली आहे . एखादी दुर्घटना घडण्याआधी रस्त्यांच्या साईडपट्टया भरण्याबरोबरच कठडे बसविण्याची मागणी होत आहे . श्रीवर्धन तालुका पर्यटनाच्या दृष्टीने दिवसेंदिवस विकसीत होत आहे येथील रस्त्यांवर वाहनांची नेहमी वर्दळ असते . परंतु अरुंद रस्ते व रस्त्यांच्या साईडपट्ट्यांची झीज झाल्याने रस्त्यांवरून वाहन चालवणे चालकांच्या जीवावर बेतणारे झाले आहे तालुक्यातील दिवेआगर , हरिहरेश्वर श्रीवर्धन या पर्यटनस्थळी पर्यटक येत असतात . तसेच स्थानिकांची नेहमी ये - जा रस्त्यावरून असते . रस्ता अरुंद व उताराचा असल्याने रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे तसेच काही ठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावर तीव्र उतार व अपघातस्थळी बोर्ड लावण्यात आलेले आहेत ; परंतु अपघात होऊ नये यासाठी रस्त्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याने रस्त्यांची दुरवस्था होत आहे . रस्त्याच्या बाजूला भरण्यात आलेली लाल मातीची धूळ चालकाच्या डोळ्यात जाऊन तसेच रस्त्यावर आलेल्या मातीवरून घसरून अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी कठडे बांधण्याची मागणी चालकांकडून होत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा