पाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे
वेळास दळवी वाडी ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात.
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ग्रामपंचायती हद्दीत 2008-09 या कालावधीत 9 व्या वित्त आयोग निधीतून केलेले दळवी वाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे अकरा लाखांचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार वेळास येथील दळवी वाडी अध्यक्ष सचिन बंधू दळवी यांनी केली आहे. शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांसह उपोषण करण्याबाबत च पत्र त्यांनी पाणी व्यवस्थापन विभागाच्या मुख्य अभियंता यांना दिले आहे.
रायगड जिल्हा परिषद च्या म्हसळा येथील पाणी पुरवठा उपविभागामार्फत हे काम कंत्राटदाराने केले. सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर बांधणे, विहीर लगत कठडा करणे, मीटर रूम मध्ये टाईल्स, पॅनल बसवणे तसेच पाईपलाईनचे काम इस्टिमेटप्रमाणे करण्यात आले नाही. या कामात त्रुटी आढळून येत आहेत. इस्टिमेटप्रमाणे तसेच शासनाच्या निर्देशित गुणवत्तेप्रमाणे काम न करता पाइपलाईनचे पाईप जागोजागी 2 फुट खोल गाडण्या ऐवजी जमिनीवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पाइपलाईन फुटण्याचा धोका आहे. या कामाची बिले मात्र काढण्यात आलेली आहेत. या तक्रारीवर वरिष्ठ अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण कक्ष मुंबई यांच्यामार्फत विहीर बांधकाम, पाईपलाईन ची परीक्षण व पाहणी करावी व संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
म्हसळा येथील पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता, श्रीवर्धन पंचायत समितीतील अभियंता तसेच सरपंच यांनी चुकीची माहिती शासनाला कळवून शासनाच्या निधीत अपहार केला आहे, असे दळवी यांनी तक्रारीत म्हटले आहे. या कामात दर्जेदार साहित्य वापरले नसल्याचे निदर्शनास आल्याने दळवी यांनी या कामाबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. तक्रारीवर वरिष्ठ कार्यालयाकडुन काय दखल घेतली जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
तर उपोषण -
दळवी वाडी येथील विहिरी चे व पाणी योजनेची कामे निकृष्ट दर्जाची आहे शिवाय विहिरीतील आतल्या पायऱ्या तुटल्या गेल्या आहेत. स्टील चा वापर कुठेच केला गेला नाही. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. 27 मार्च रोज पत्र पाणी व्यवस्थापन खात्याला मिळाले असून पंधरा दिवसांत कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास सर्व ग्रामस्थ आम्ही उपोषण करणार आहोत असे तंटामुक्ती गाव सदस्य व भाजपा जनरल कामगार युनियन चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन दळवी यांनी सांगितले.

Post a Comment