एटीएम मध्ये कुणी पैसे टाकेल का ? दिवेआगर पर्यटन ठिकाणी कॅशलेस एटीएम मुळे नागरीक व पर्यटकांची अडचण.


एटीएम मध्ये कुणी पैसे टाकेल का ?
दिवेआगर पर्यटन ठिकाणी कॅशलेस एटीएम मुळे नागरीक व पर्यटकांची अडचण. 
श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड मधील एटीएम मध्ये ठणठणाट 

म्हसळा : निकेश कोकचा

श्रीवर्धन - म्हसळा तालुक्यासह दक्षिण रायगड जिल्ह्यात जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांनी "एटीएम' ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याकडे मात्र संबंधित बॅंकांचे दुर्लक्ष होत आहे. तांत्रिक बिघाड, पुरेशा रकमेअभावी वारंवार "एटीएम' मशिन बंद असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

महाड पासून दक्षिण रायगड जिल्ह्यातील सर्वच एटीएम मध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून ठणठणाट आहे.   श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली  येथील बँकेत बोर्लीपंचतन, दिवेआगर,वडवली, दिघी, शिस्ते, कापोली, कुडगाव तसेच दांडगुरी आदी गावांतील व्यवहार होतात. बँक ऑफ महाराष्ट्र, एसबीआय तसेच अनेक बँक बोर्ली शहरात असल्याने नेहमीच नागरिकांची धावपळ पाहायला मिळते. शहरात दोनच एटीएम आहेत. मात्र बहुतेक वेळी त्या दोन्ही मशीन शोभेच्या वस्तू बनतात. धावपळीच्या युगात रांगेत उभे राहून बॅंकेत पैसे काढण्यासाठी बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. त्यामुळे अशा ग्राहकांनी "एटीएम' सेवेचा वापर करण्यास सुरवात केली आहे. "नव्याचे नऊ दिवस' बँकेने चांगली सेवा दिली होती. परंतु कालांतराने  बॅंकेच्या सेवेत त्रुटी निर्माण झाल्या. त्यामुळे प्रवासा दरम्यान पेट्रोल पंपावरील  बॅंकेंची "एटीएम' सेवा "असून अडचण नसून खोळंबा' अशीच झाली आहे. 

दिवेआगर, दिघी - जंजिरा पर्यटन स्थळी  जाणाऱ्या पर्यटकांची  नेहमी वर्दळ या ठिकाणी असते. विशेष म्हणजे एटीएम नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांना ही त्रास होतो. कार्ड ज्या बँकेचे आहे त्या एटीएम मध्ये पैसे नसल्यास आर्थिक भुर्दंड असताना देखील इतर बँकेच्या एटीएम चा वापर करतात. मात्र, तिथेही रक्कम काढता येत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करतात. याकडे शेजारीच असलेले बँक अधिकारी हात वर करून मोकळे होतात. 

इंटरनेट नाही तर स्वाईप कसे करणार ? 
-  पुण्याहून अनेक पर्यटक डेबिट कार्ड द्वारे पेमेंट करायला विचारतात मात्र, स्वाईप मशीन सुविधा नसल्याने त्यांचाही खोळंबा होतो. कॅश काढायला गेले तर अनेकदा एटीएम बंद असते. शिवाय बँकांकडून देखील दुर्लक्ष होत असल्याने कॅशलेस मोहीम कालबाह्य झाल्याचे दिसते. आयडिया, डोकोमो व व्होडाफोन इंटरनेट नसल्याने स्वाईप मशीन आणूनही फायदा होत नसल्याचे दुकानदार सांगतात. 

कॅशलेस च्या नावे...
सरकारने नोटबंदी नंतर कॅशलेस ला महत्व दिले आहे, मात्र, प्रत्यक्षात इंटरनेट सुविधा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाही. इंटरनेट बँकिंग साठी 'वन टाइम पासवर्ड' - ओटीपी यायला पाच ते दहा मिनिटे लागतात. विशेष म्हणजे या परिसरात बीएसएनएल च्या सुविधेला येथील ग्राहक प्रचंड वैतागला आहे. 


पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणी तरी किमाण राष्ट्रीयकृत बॅकांनी एटीएम मध्ये पैसे ठेवावे. ग्राहकांची अथवा पर्यटकांची गैरसोय झाल्यास सदर बँकांना धडा शिकवला जाईल., मंगेश म्हशिलकर सदस्य,भाजप जिल्हा कार्यकारणी रायगड

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा