भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकवरच असेल – राजिप अध्यक्षा आदीती तटकरे
कोट्यावधीची विकासकामे मंजूर, जिल्हा मार्गासाठी दिड कोटी रुपयांचा निधी
माणगांव : प्रवीण गोरेगांवकर
माणगांव व तळा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे व रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला असून अनेक कामे प्रस्तावित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा वारू तळा व माणगांव तालुक्यात चौफेर उधळला असून विरोधकांकडून कोणतीही कामे होत नसल्याने भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकवर असेल असे रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम अध्यक्षा आदीतीताई तटकरे यांनी इंदापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश युवा सचिव दिपकशेठ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शेखरशेठ देशमुख, विभागीय अध्यक्ष काका नवगणे, दत्ता पाटील, माणगांव तालुका राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष, माजी सरपंच दिनेश महाजन, युवा कार्यकर्ते समीर मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आदीतीताई तटकरे यांनी इंदापूर विभागातील वावे दिवाळी, वडाची वाडी, महागांव, बार्पे महूरे, कोरखंडा रस्ता तसेच इंदापूर उमरोली, कोल्हाण, खडसांबळे, गौळवाडी हे तळाशेत इंदापूरला जोडणारे मुख्य रस्ते इतर जिल्हा मार्गामधून मुख्य जिल्हा मार्गामध्ये रुपांतरीत करण्यात आले असून त्यासाठी सुमारे दिड कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रस्ताविक आहेत. आ. सुनिल तटकरे त्यासाठी प्रयत्नशील असून लवकरात लवकर आठवड्याभरात या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. जिल्हा मार्गातील अनेक दुर्लक्षित रस्त्यांपैकी भूवन आ. वाडी रस्ता, माकटी बौध्दवाडी रस्ता, रातवड आ. वाडी शाळेचा रस्ता, उमरोली तर्फे दिवाळी रस्ता यासाठी सुमारे 15 लक्ष रुपयांची तरतूद जिल्हा परिषद सेस फंडातून व ठक्करबाप्पा योजनेतून करण्यात आलेली असल्याची माहीती यावेळी आदीतीताई तटकरे यांनी दिली. कोकण पर्यटन योजनेतून उमरोली तर्फे दिवाळी येथील स्वयंभू श्री शंकर मंदिरासाठीदेखील 38.50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याचे कामही सुरु होत असल्याची माहीती कु. आदितीताई तटकरे यांनी दिली.

Post a Comment