गोरेगांवचे सांस्कृतिक वैभव... श्री भैरवनाथ जत्रोत्सव
गोरेगाव - प्रवीण गोेरेगांवकर
रायगड जिल्हा, माणगांव तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांबरोबरच सांस्कृतिक वारसा जपणारे छोटेखानी शहर मागील काही दशकात परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कोकण रेल्वे विविध आर्थिक पतसंस्था, नामवंत विद्यालये यामुळे उपलब्ध होत असलेल्या रोजगारांच्या संधीमुळे पुर्णतः बदलून गेले आहे. सामाजिक व राजकीयदृष्ट्या संवेदनशील व महत्वाचे शहर म्हणून गोरेगांव ओळखले जाते.
भैरवनाथ उत्सवाच्या आदल्या दिवशी सुर्योदयाच्या वेळी लाटेसाठी योग्य असलेल्या ऐन जातीच्या झाडाची विधीवत पूजा करुन ते तोडण्यात येते. सुतार समाजाची वतनदार मंडळी त्याला आकार देऊन त्याची सजावट केली जाते. दिवसभरामध्ये लाटेला केलेले शाकाहारी व मांसाहारी नवस फेडले जातात तर नवीन नवस केले जातात. सायंकाळच्या सुमारास लाट गोरेगांव मुक्कामी आणण्यास सुरुवात केली जाते. जागृत देवस्थान असलेल्या भैरवनाथाच्या लाटेचे ठिकठिकाणी स्वागत व पूजा केली जाते. यात्रेच्या दिवशी मंदिराला सुशोभित करुन मंदिरातील दैवते श्रीभैरी भवानी, श्री. जोगेश्वरी, श्री.गोंदीर, श्रीशंकर, श्री. काळकाई श्रीचांदोरकरणी माता यांना चांदीचे मुखवटे व वस्त्रालंकारानी सजवले जाते. श्री भैरवनाथांना रत्नजडीत मुखवटा चढविला जातो आणि मग खऱ्या अर्थाने यात्रेला रंगत येऊ लागते.
वाद्यांच्या गजरात जंगलातून आणलेली लाट २० ते २५ फुट उंच बगाडावर चढविली जाते. पुर्वी बगाड संपूर्ण लाकडाचे होते. जीर्ण झाल्यामुळे लाट चढवितांना व फिरवताना संपूर्ण बगाड हालत असे. मात्र आजपर्यंत
कोणताही अपघात झाला नाही. बगाडच्या मध्यभागी असलेला मुख्य खांब सुमारे १५० वर्षांपूर्वी बसविलेला होता. हा खांब जीर्ण झाल्याने बदलण्याचा निर्णय विश्वस्त मंडळींनी घेतला. यासाठी भैरवनाथाची आज्ञा घेण्यात आली. नवीन बसविलेला मुख्य खांब ऑस्ट्रेलियातून आयात केला असून मसुरी साग या जातीचा आहे. नवीन खांब बसविण्यासाठी खोदून जुना खांब काढला असता पुरातन काळी अखंड दगडामध्ये चार ते साडेचार फूट खोल टाकी कोरुन त्यामध्ये खांब बसविल्याचे आढळून आले. विलक्षण योगायोग किंवा भैरवनाथाचा साक्षात्कार म्हणजे नवीन खांब जसा आयात करण्यात आला होता. त्यामध्ये कोणताहि बदल न करता जुन्याच कोरीव टाकीमध्ये व्यवस्थित बसला. जीर्ण झालेले लाकडाचे बगाड देखील आता आर.सी.सी.मध्ये मजबूत बांधण्यात आले आहे. याच बगाडावर लाट चढवतानां हार, नारळाचे तोरण, रंगीबेरंगी, फुग्यानी सजवली जाते. लाटेच्या दोन्ही बाजुला मजबूत दोरखंड बांधून लाट चढवली जाते. यानंतर भैरवनाथांची
पालखी आपली भावंडे श्री गोंदविर व पिर यांना भेटावयास निघते. त्यांच्या स्थानासमोर उभे राहून बा विरा, बा पिरा, बा गोंदीरा आम्ही हा उत्सव सुरू करीत आहोत. या सोहोळ्याला हजर रहावे असे धीरगंभीर आवाजात आवाहन करुन भक्तिपूर्ण पाचारण केले जाते. विधीवत पूजा अर्चा करुन अत्यंत वातावरणात लाट फिरवण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली जाते. लाटेच्या एका बाजूला गवळी समाज तर दुसऱ्या बाजूला चांभार समाजाचे वतनदार असतात. बगाडावर असलेल्या पिंगवीमध्ये लाट व्यवस्थित बसल्यानंतर चल भैरी .. चल रे चल... हर हर महादेव... च्या प्रचंड घोषणा गजरात, ढोलताशे व घंटाच्या निनादात बेहोश होत वतनदार चित्तथरारकपणे लाट फिरवतात यात्रेला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले दर्शक, भाविक चल भैरी चल रे चल प्रचंड जयघोष करीत प्रोत्साहन देत असतात. रोमांचकारी भक्तिमय वातावरणात ५ वेळा लाट फिरवली जाते व मग यात्रेला सुरुवात होते.
रात्रीच्या सुमारास जत्तर काठ्या येतात. पुर्वी ८४ गावाच्या काठ्या या उत्सवाला यायच्या. यापैकीच भिनाडची काठी ही शिवरायांच्या काळापासून येते. संपूर्ण शहरात वाद्याच्या गजरात काठ्या नाचवल्या जातात.पहाटे सहा वाजल्यापासून बाहेरगावातून येणाऱ्या पालख्या, काठ्या, ग्रामदेवतेची पालखी यांची सांगता मिरवणूक मंदिरापासून सुरू होते. सर्वांना मानाचा नारळ व इतर मान पान देऊन आभार मानले जातात
श्री भैरवनाथ देवस्थानाला हिंदू समाजातील चांभार, गवळी, बुरुड, सोनार, सुतार, कुणबी, ब्राम्हण, कुंभार आदी सर्व समाजाच्या वतनदारांप्रमाणेच मुस्लिम समाजाचे देखील वतनदार आहेत. पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा व वैभव टिकविण्याचा प्रयत्न गोरेगांवकर मंडळी आजही करीत आहेत. भैरवनाथाचे मंदिर आजही आहे त्याच स्थितीत आहे. देवस्थानाची शेकडो एकर जमीन पडून आहे त्याचा कोणताहि मोबदला देवस्थानाला दिला जात नाही. या जमीनींचा शोध घेऊन जमीनी ताब्यात घेणे व मंदिराच्या जीर्णोध्दार करणे या उद्देशाने गोरेगांवमधील तरुण वर्ग पुढे सरसावला आहे. यावर्षी जत्रोत्सवाला येणाऱ्या दानशुर उच्छुक देणगीदार भाविकांनी मंदिराच्या कमिटीजवळ संपर्क साधून आपले नांव, पत्ते व संपर्क क्रमांक देण्याचे आवाहन गोरेगांवच्या ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment