●भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे पं.स.सभापती उज्वला सावंत यांचे आश्वासन
● अनेक सरपंच, ग्रामसेवकांनी दिलेत कामांचे खोटे ठराव
● अनेक ग्रामसेवक, आजी-माजी सरपंच येणार गोत्यात
● संस्थांचा हलगर्जीपणा तालुक्याला भोवला
● शासनाचे करोडो रुपये पाण्यात
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यात महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा सन 2012-13 पासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पाचा कालावधी सन 2012-13 ते 2016-17 असा आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन सन 2012 पासून हा प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला होता. या पाणलोट प्रकल्पाला सहा वर्ष पूर्ण झाली असून देखील अनेक ग्रामपंचायत हद्दितील इ.पी.ए, उपजिविका, व नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रस्तावित विकासकामे अद्याप पर्यंत पूर्ण झालेली नाहीत.
अनेक वेळा ग्रामसभेचे ठराव वरिष्ठ कार्यालयात पाठवूनही कोणतेही सकारात्मक प्रयत्न संस्थांकडून केलेले नाहीत असे पाणलोट समिती अध्यक्ष व सरपंचांचे म्हणणे आहे. तर स्थानिक संस्थांना डावळून बाहेरील सस्थांना ही कामे दिलेली असून या संस्थानी विकास कामांच्या नावावर कामे झालेली दाखवून ठेकेदाराला आगाऊ रक्कम वर्ग केलेली आहे असे काही समिती अध्यक्षांचे म्हणणे आहे. सन 2015 मधे मार्च महीना संपल्यावर ही 31 मार्च च्या अगोदर कागदोपत्री कामे झालेली दाखवून त्या कामांचे बिल ठेकेदाराला दिलेले आहे. तर ज्या काही ग्रामपंचायतित कामे झालेली आहेत ती कामे निकृष्ट दर्जाची आहेत असे प्रत्यक्ष कामांची पाहणी केलेल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर अनेक कामांची रक्कम परत गेलेली आहे. या प्रकल्पाबाबत म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींची प्रत्येक ग्रामपंचायत निहाय चौकशी झाली पाहिजे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून या प्रकल्पाची योग्य ती चौकशी करण्यात आली पाहिजे आणि संबंधित दोषींवर कारवाई करून शासनाच्या निधीचा होत असलेला दुरुपयोग थांबविला पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
पाणलोट प्रकल्पात जी काही कामे झाली आहेत ती कामे करून घेण्यासाठी काही ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांनी कामाची मागणी ठराव, जागा उपलब्ध असणे, कामाची देखभाल दुरुस्ती करणे, काम पूर्ण झाल्याचा दाखला असे ग्रामपंचायत कडून देण्यात येणारे दाखले व ठराव खोटे दिलेले आहेत.
म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधे झालेल्या भ्रष्टाचाराची ग्रामपंचायत निहाय सविस्तर माहिती घेऊन जे ग्रामसेवकांनी व सरपंचांनी कामाच्या संदर्भात खोटे ठराव किंवा नाहरकत दाखले दिले असतील त्यांची सविस्तर चौकशी करून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असल्याचे पंचायत समिती सभापती सौ.उज्वलाताई सावंत यांनी आमच्या प्रतिनिधींशी पाणलोट प्रकल्पाबाबत बोलताना आश्वासन दिले आहे.
म्हसळा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींची एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन विकासाची कामे रखडली असून ही शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कोटयावधी रुपयांची विकास कामे रखडली आहेत तर संस्थानी लावला आहे चुना अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे झालेली कामे निकृष्ठ दर्जाची असून ही कामे जनतेच्या सोयीसाठी की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी असा सवाल तालुक्यातील जनता करीत आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प सन 2012-2013 पासून सुरु करण्यात आला असून या प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर आहे असे ग्रामसभा घेऊन सांगण्यात आले होते.
या प्रकल्पात तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा समावेश असून महसुली गावांमधे प्रकल्प उत्तमरित्या राबविण्यासाठी ग्रामपंचायतींचे एकूण 3 क्लस्टर तयार करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे क्लस्टर क्र.1 तालुका कृषी विभाग यांचेकडे असून 22 ग्रा.पं. व 22 पाणलोट सचिव या क्लस्टर मधे आहेत तर क्लस्टर क्र. 2 श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ सातारा सलग्न शाखा महाड-पोलादपुर यांचेकडे 9 ग्रा.पं. व 9 पाणलोट सचिव आणि क्लस्टर क्र. 3 ग्रामीण कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान उजनी टे. इंदापूर (IWMP36WF50) या संस्थेकडे देण्यात आले होते परंतु या संस्थेने कामात हलगर्जी केल्यामुळे आता क्लस्टर क्र.3 चे काम रक्षित सामाजिक संस्था या संस्थेकडे देण्यात आले आहे यामधे 8 ग्रा.पं. व 8 सचिव असे 3 क्लस्टर करुन 39 सचिवांची वेगवेगळया ग्रामपंचायत मधे मानधन तत्वावर दि.15 ऑगस्ट 2013 च्या ग्रामसभा ठरावानुसार नेमणूक करण्यात आलेली आहे.
सुरुवातीला तालुक्यात 40 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. या 40 मधील म्हसळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यामुळे सध्या तालुक्यात 39 ग्रामपंचायती आहेत. पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
पाणलोट क्लस्टर क्र. 2 श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ सातारा सलग्न शाखा महाड-पोलादपुर यांसंस्थेकडे भेकऱ्याचा कोंड (चिरंगाव), चिखलप, देवघर, घोणसे, खारगाव बुद्रुक, पाभरे, निगडी, कांदलवाडा, लेप या ग्रामपंचायती तर क्लस्टर क्र. 3 (IWMP36WF50) या मधे मांदाटणे, ठाकरोळी, घुम-रुद्रवट, कुडगाव, पांगळोली, तोराडी, केलटे, कोळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर उर्वरित 22 ग्रामपंचायती कृषी विभागाकडे आहेत.
अनेक ग्रामपंचायतींमधे प्रत्यक्ष कामे झालेले नाही तरीही (तत्कालीन इंजिनिअर) श्री.पी.जी.अत्तार उपअभियंता म्हसळा-श्रीवर्धन यांनी न झालेल्या कामांचे मूल्याकंन करून सदर कामे पूर्ण झाल्याचे दाखले (वर्क कम्प्लिटेशन सर्टिफिकेट) कसे काय दिले हा प्रश्न निर्माण होत आहे.
तसेच काही सरपंच व ग्रामसेवकांनी गावात अगोदर काही वर्षांपूर्वी झालेली जुनी विकासकामांवर नवीन कामांचे ठराव देऊन ठेकेदार, इंजिनियर, सरपंच, समिती अध्यक्ष यांनी संगनमताने पदाचा गैरवापर करून बिल मंजूर करून पैसे काढले आहेत. त्यामुळे या सर्व इंजिनिअर, ठेकेदार, ग्रामसेवक, सरपंच, समिती अध्यक्ष यांच्यावर कारवाई होईल का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यातील या पाणलोट प्रकल्पाबाबत प्रत्येक ग्रामपंचायत निहाय चौकशी झाली पाहिजे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून या प्रकल्पात भ्रष्टाचार केलेल्या संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करून शासनाच्या निधीचा होत असलेला दुरुपयोग थांबविला पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. म्हसळा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींची एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन विकासाची कामे रखडली असून ही संबंधित संस्था व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कोटयावधी रुपयांची विकास कामे रखडली आहेत तर संस्थानी कामांच्या नावावर चुना लावला आहे अशी परिस्थिती असून म्हसळयात एकात्मिक पाणलोट विकास कामांचा बोजवारा उडाला आहे त्यामुळे झालेली कामे निकृष्ठ दर्जाची असून ही कामे जनतेच्या सोयीसाठी की ठेकेदार आणि अधिकाऱ्यासाठी असा सवाल तालुक्यातील जनता करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील पाणलोट विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे उघड होत असून पाणलोट प्रकल्पाचे “पाणी नेमके मुरतय कुठे” हे शोध घेणे गरजेचे आहे.
————————-
● प्रतिक्रिया :म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीं मधे पाणलोट विकास कार्यक्रम मधील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय ग्रामसेवकांकडून संबंधित कामांचे ठराव, झालेला खर्च, साध्यस्थीतील कामाचे फोटो अशी तपशीलवार सविस्तर माहिती मागवून सर्व दोषींवर कारवाई करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.श्री.संदिप चाचलेसदस्य – पंचायत समिती म्हसळा
म्हसल्यातील पाणलोट मध्ये झालेल्या भ्रष्टाचार म्हणजे हा तालुक्यातील अधिकारी वर्ग व शासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळे झालेला आहे तरी या भ्रष्टाचाराची ग्रामपंचायत निहाय सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.श्री.जनार्दन बसवतसामाजिक कार्यकर्ते म्हसळा

Post a Comment