जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,रायगड यांच्या वतीने सोमवार दि. १६ ते गुरुवार दि.२६ एप्रिल या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल,नेहुली संगम, पो.वेश्वी, ता.अलिबाग, जि.रायगड येथे निवडक १०० क्रीडा शिक्षकांसाठी १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शासनाने राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण जाहीर केलेले आहे. खेळामधील आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, शास्त्रोक्त माहिती जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना मिळून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी या उद्देशाने हे शिबीर जिल्हा क्रीडा संकूलात होणार आहे. या शिबीरासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, शासन अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचा लाभ घेतलेल्या क्रीडा शिक्षकाला पुढील किमान तीन शैक्षणिक वर्ष या शिबीराचा लाभ घेता येणार नाही. क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरामध्ये प्रवेश घेतलेल्या क्रीडा शिक्षकांना शासनाकडून ट्रॅकसूट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आयोजन समितीच्यावतीने विनामुल्य भोजन व निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये विविध खेळांचे तज्ज्ञ व्यक्ती, मास्टर ट्रेनर्स, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांच्या मार्फत विविध खेळातील बदललेले नियम, तंत्रज्ञान, क्रीडा मानसशास्त्र, खेळातील कौशल्यासाठी विविध पुरक व्यायामप्रकार, सकस आहार, डोपिंग, मेडीटेशन, शासनाच्या खेळाडूंसाठी असलेल्या विविध योजना याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील ज्या क्रीडा शिक्षकांना या शिबीरात सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्यांनी अधिक माहिती व विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करण्यासाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, पो.वेश्वी, ता.अलिबाग येथे किंवा सुनिल कोळी, क्रीडा अधिकारी ८४११८७५३९८ , विशाल बोडके, क्रीडा अधिकारी ९८९०९१९२९७, विशाल गर्जे, क्रीडा मार्गदर्शक ८०८७०७६६३३ यांचेशी संपर्क साधावा व दि. १० एप्रिल पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत जमा करून नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Post a Comment