यशवंतगडाची हॉटेलसाठी विक्री...? शिवप्रेमी व ग्रामस्थांमध्ये संताप, पालकमंत्र्यांचे मौन...

यशवंतगडाची हॉटेलसाठी विक्री?

शिवप्रेमी व ग्रामस्थांमध्ये संताप, पालकमंत्र्यांचे मौन

मुरूड जंजिरा - अमूलकुमार जैन

अरबी समुद्राच्या विशाल लाटा वषार्नुवर्षे झेलत समर्थपणे उभा असलेला आणि इतिहासाची साक्ष देणारा शिवकालीन अविचल यशवंतगड पंचतारांकित हॉटेलसाठी विक्रीला काढण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. रेडी येथील यशवंत गडाच्या प्रवेशद्वारावर ‘मूनराइस टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड इंडिया’ या खासगी कंपनीने ऐतिहासिक यशवंतगड ही वास्तू आपली खासगी मालमत्ता असल्याचा फलक लावला आहे. हा बेकायदा फलक कायदेशीर कारवाई करून तालुका प्रशासनाने त्वरित हटवावा अन्यथा सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थ एकत्रितपणे आंदोलन उभारू असा इशारा निवेदनाद्वारे सोमवारी शिवप्रेमींनी वेंगुल्र्याचे तहसीलदार शरद गोसावी यांना दिला आहे. दरम्यान एवढी मोठी घटना आपल्या मतदारसंघात घडूनही या भागाचे पालकमंत्री दीपक केसरकर मौन बाळगून असल्याने रेडी गावासह पंचक्रोशीत विविध तर्कवितर्क केले जात आहेत.

महाराष्ट्रातील शिवकालीन इतिहासानुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील यशंवतगड ही शेकडो वर्षापूर्वीची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी व गडाच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील शिवप्रेमी व रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकत्रित येऊन एका बाजूने प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी गडावर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, जागतिक महिला दिन, गडाची साफसफाई यासारखे विविध कार्यक्रम घेऊन प्रशासन व पुरातत्व विभाग यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच सध्या महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी व पर्यटक या पुरातन यशवंत गडाच्या वास्तूस भेट देतात.

मूनराइस टुरिझमने यशवंतगड ही वास्तू खासगी असल्याचा फलक गडाच्या प्रवेशद्वारावर लावल्यामुळे  गडाला भेट देणा-या पर्यटक व ग्रामस्थ यांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे या कंपनीने लावलेला फलकाबाबत कायदेशीर कारवाई करून त्वरित हटवण्याचे निवेदन जिल्ह्यातील शिवप्रेमी व रेडी पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार यांनी सदर गडाच्या विक्रीची नोंद अभिलेखात नसल्याचे सांगत पुरातत्व विभागाकडून अधिक माहिती घेणार असल्याचे सांगितले. तसेच किल्ल्यावर लावलेल्या फलकावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवप्रेमींनी आज यशवंत गडाकडून मोटरसायकल रॅली काढत वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी व वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांना लेखी निवेदन सादर केले. सात दिवसांत तो बेकायदेशीर फलक न हटवल्यास जनआंदोलन छेडणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गडावर हॉटेल सुरू करण्याचा मनसुबा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गाव खरे तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.  भरभक्कम यशवंतगडाची तटबंदी सरकारी मालकीची, तर आतला भूभाग  स्थानिक शेतक-यांचा मालकीचा. त्यातही एकाच किल्यावर शेकडोंची मालकी. त्यामुळे या किल्ल्याची दैना झाली आहे. याचाच फायदा उठवत मूनराईस सारखी कंपनी असे फलक लावण्याचे धारिष्टय़ करु शकते.

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री  दीपक केसरकर यांनी या गडाच्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी सुमारे ९ कोटी रुपये शासकीय निधीतून देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आतील जमिनिवर खासगी कंपनीला विदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी अलिशान फाईव्ह स्टार हॉटेल उभे करता यावे व बाहेरून शासकीय निधीतून गडाची तटबंदी त्या खासगी कंपनीच्या फायद्यासाठी बनवायची. असा मनसुबा त्यांचा असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा