वारळ ग्रामपंचायतीवर शिवसेना – काँग्रेस युतीचा विजय , शिवसेनेचे रमेश खोत सरपंच पदी विजय
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील एकमेव वारळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी ला चारी मुंड्या चीत करीत सरपंच पदाचे शिव-सेना काँग्रेस युतीचे उमेदवार रमेश खोत यांच्यासहित ५ सदस्य बहुमताने निवडणून आले तर राष्ट्रवादीचे फक्त २ सदस्य निवडून आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवारी(२७ फेब्रु) झालेल्या वारळ ग्रामपंचायत निवडणुकी बाबत संपूर्ण म्हसळा तालुक्यात उत्सुकता होती. काही महिन्यापूर्वी झालेल्या १३ ग्राम पंचायतींमध्ये खरसई सारख्या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायती मध्ये शिवसेना-काँग्रेस च्या युतीचा सरपंच निवडून आला होता त्या अनुषंगाने शिवसेना-काँग्रेस युतीचा हा नवीन प्रयोग पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचे चित्र म्हसळा तालुक्यामध्ये काल पहावयास मिळाले. सदर निवडणुकीत शिवसेना- कॉंग्रेस युतीचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार रमेश खोत यांना ४१९ मते मिळाली तर राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार मधुसुदन पाटील याना केवळ १९६ मते मिळाली. तर शिवसेना- काँग्रेस युतीच्या निवडून आलेल्या सदस्यां मध्ये समीर बेडेकर, मालती बिराडी, रुपेश श्रीवर्धनकर, तबस्सुम काझी, भारती सायगावकर यांचा समावेश होता. तर राष्ट्रवादी कडून नारायण पाटील व उषा टावरी हे दोन सदस्य निवडून आले. वारळ ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये सेनेचे नेते महादेव पाटील व काँग्रेस चे तालुका अध्यक्ष डॉ. मोईज शेख यांच्या समवेत नथुराम खोत , रेहामातुल्ला मुकादम, बाबू पाटील, काशिनाथ चाळके, कल्पेश बिराडी, रफिक काझी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Post a Comment