खरसईवाशीयांचा मुंबईत 95 वर्षांचा शिमगा उत्सव ...
म्हसळा,
प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील मुंबईस्थित खरसई वाशीयांचा होळी सणाला 95 वर्षांचा इतिहास असून यंदाही होळीउत्सव दि. १ मार्च २०१८ रोजी रात्रौ ११.०० वाजता बि. आय.टी. चाळ मुंबई सेंट्रल येथे उत्साहाने संपन्न होणार आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,कामानिमित्त ग्रामीण भागातून मुंबईत आलेला चाकरमानी शिमग्यासाठी मात्र गावाकडची वाट धरतो.किंबहुना कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या प्रत्येकालाच गावी जाण शक्य होतं असं नाही. मग हा चाकरमानी जुन्या आठवणी कवेत घेऊन आपल्या कामात रमतो. काही वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आलेल्या खरसईकरांची अशीच अवस्था होती. खरसई सोडून मुंबईत चांगले स्थिरावले होते, काही नोकरीत तर काही आपल्या व्यवसाय यात रमले होते. खरसई तील बरीचशी कुटुंब मुंबई सेन्ट्रल येथील बी. आय. टी चाळीत तर काही मुंबई च्या विविध ठिकाणी जाऊन उदर निर्वाह करत होते. मुंबईत स्थिरावले असले तरी गावाशी नाळ अजूनही जोडली होतीच. त्यातूनच खरसई चा प्रत्येक तरुण एकवटला आणि सन 1923 साली "खरसई ग्रामस्थ आगरी समाज मंडळ मुंबई" ची स्थापना केली. आपल्या मातीतील सण ,उत्सव आनंदाने मुंबईत साजरा करत पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा सांभाळल्या.मुंबईत अनेक संकटे आली त्या संकटाना सामोरे जाऊन खरसईकरांनी आपली परंपरा चालूच ठेवली. बी. आय. टी. चाळीत सुरू केलेला शिमगा प्रति कोकणची प्रचिती देत होता. अगदीच पहिल्या पिल्या (पहिली होळी) पासून सुरू होणारा शिमगोत्सव मोठ्या होमा ( होळी ) च्या दिवशी संपतो. पर्यावरण पूरक होळीची मांडणी खरसईकर करून अगदी गवत आणि होळीच्या पारंपरिक वस्तू खरसईकर गोळा करतात. अगदीच कोकणात प्रसिद्ध असलेला खालू बाजा पथकाची आसपासच्या मंडळीना पर्वणी ठरते. पाच पाटील, खरसई ग्रामस्थ आगरी समाज मंडळ अध्यक्ष आणि समस्त खरसईकर शिमग्यासाठी बी. आय. टी. चाळीत उपस्थित असतात. मुंबईपासून साधारणपणे २०० किलोमीटर अंतरावर वसलेल्या खरसई ( म्हसळा तालुक्यातील )गावातील आगरी लोक नोकरीच्या विवंचनेत मुंबईत दाखल झाले असले तरी आजमितीस खरसईकर हीच अखंडता जोपासत जवळ जवळ १२०० हुन अधिक सभासद मुंबईच्या विविध भागात राहून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावातील लोक विविध सण साजरे करत आपली संस्कृती जपत, स्वतःची नोकरी सांभाळत आपल्या गावाचा नाव विविध क्षेत्रात उज्ज्वल करत आहेत.हिंदू परंपरेतील अनेक सणांपैकी एक शिमगा सण खरसईकर मुंबई सेंट्रल येथे जाऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात .मराठी संस्कृतीचा पारंपारिक वारसा आपण जपला पाहिजे याचं मुख्य कारण म्हणजे सन १९७० - ७१ च्या आणीबाणीच्या काळात व सन १९९२ च्या दंगलीत सुद्धा हा होलिकोत्सव थांबला नसल्याचे खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष काशीनाथ पयेर यांनी सांगितले.
चौकट
आगरी समाजातील आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३७) यांच्यासह सन 1923 साली एकत्र येऊन खरसई ग्रामस्थ आगरी समाज मंडळ मुंबई याची मुहूर्तमेढ होऊन 1935 साली ही संस्था पूर्णपणे कार्यरत झाल्याचा इतिहास असून ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.

Post a Comment