शहरी भागात नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी रमाई घरकुल (नागरी) योजना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे.
शहरी भागातील कच्चे, मातीचे, गवती छपरांची घरे असणाऱ्या तसेच नगरपरिषद, नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये स्वत:ची जागा असणाऱ्या गरजू व्यक्तींना सदर योजने अंतर्गत पक्के बांधकाम केलेले घर बांधून देणे असा या योजनेचा उद्देश आहे.
बहुतांशी अनुसूचित लोक हे कच्चया घरामध्ये राहतात. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पक्के घर बांधणे शक्य होत नाही. तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातील बहुतांशी लोक शहराकडे आलेले आहेत. शहरामधील वाढत्या किंमतीमुळे तेथे ते स्वत:चे घर घेऊ शकत नाही. पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. शहरी भागातील अनूसचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने ही महत्वाकांक्षी योजना आखली आहे. पात्र लाभार्थ्यास रक्कम रु.2 लाख 50 हजार इतके अनुदान त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये देण्यात येईल.
सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
7/12 चा उतारा (अट शिथिलक्षम आहे.) मालमत्ता नोंदपत्र (प्रॉपर्टी रजिस्टर कार्ड). ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक. घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बील या कागदपत्रांपैकी साक्षांकित प्रत. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला. शाळा सोडल्याचा दाखला. दिनांक 1 जानेवारी, 1995 च्या किंवा मतदार यादीतील नांवाचा उतारा. निवडणूक मतदार ओळखपत्र. रेशनकार्ड. सरपंच/तलाठ्याचा दाखला. महानगरपालिका / नगरपालिकेतील मालमत्ता कर भरल्यास पावतीची प्रत. रहिवाशी दाखला. मुख्याधिकारी यांचे शिफारस. लाभार्थ्यांच्या कुटुंबासोबत जागेचा फोटो. लाभ न घेतल्याचा दाखला. आधारकार्ड. लाभार्थी हिस्सा नगरपरिषद क्षेत्र 7.5 टक्के, महानगरपालिका क्षेत्र 10 टक्के. उत्पन्न मर्यादा रु. 3 लाख. घर पूर्ण झाल्यानंतर त्या घरावर सामाजिक न्याय विभागाच्या अर्थ सहाय्यातून घर बांधण्यात आले असे स्पष्ट नाव व वर्ष असलेली कोरीव कोनशील तयार करुन बसवावी. बिल्डींग/प्लॅटमध्येही प्रवेशद्वारावर सामाजिक न्याय विभागाच्या अर्थ सहाय्यातून घर बांधण्यात आले असा नामफलक लावण्यात यावा. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या कुटूंबासोबत घराचा फोटो घेण्यात यावा.
अर्जाचा नमूना व अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंधळपाडा ता.अलिबाग, जि.रायगड दूरध्वनी क्रमांक 02141-222288 या कार्यालयाशी संपर्क करावा.

Post a Comment