म्हसळा : प्रतिनिधी
तब्बल रु. ७८७८० वीज बिल थकविल्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयाची वीज काल(२० फेब.) सकाळी ११.०० च्या सुमारास महावितरणने कापली. ग्रामीण रुग्णालयात वीज पुरवठा नसल्याने एक प्रकारे आरोग्य प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळच करीत असल्याचे काल निदर्शनास आले. याबाबत सवीस्तर वृत्त असे की मार्च २०१७ पासून आजतागायत रुग्णालय वापरत असलेल्या विजेचे बिल न भरल्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयावर विद्युत पुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढावली. म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन होऊन जवळजवळ ४ वर्षे झाली आहेत परंतु शासनाच्या विविध विभागांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे आजतागयत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे सदर ग्रामीण रुग्णालयाची इमारत हस्तांतरित केली गेली नाही. तसेच जरी हे ग्रामीण रुग्णालय असले तरी अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र , म्हसळा याच इमारतीत कार्यान्वयित आहे. यामुळे या इमारतीत एकाच वेळी ग्रामीण रुग्णालय , व प्राथमिक आरोग्य केंद्र असे आरोग्याचे दोन विभाग कार्यरत असल्यामुळे वीज बिल कोणी भरावे हि अडचण असल्याचे दोनही विभागाचे आरोग्य अधिकारी सांगत आहेत. परंतु या झाल्या त्या त्या विभागाच्या तांत्रिक अडचणी , पण यामध्ये सरकारी रुग्णालयाच्या उपचारांवर अवलंबून असणाऱ्या आम्हा सामान्य रुग्णाचा दोष काय ? असा सवाल रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रसूतिगृह , प्रयोगशाळा, रुग्ण कक्ष सेवा ठप्प होऊन हजारो रुपयांच्या वेगवेगळ्या लस वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गवळी यांनी फोन द्वारे वीज देयक भरण्याचे आश्वासन महावितरण च्या अधिकाऱ्याना दिल्यामुळे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.
वारंवार वीज देयक भरणा करण्यासाठी नोटीसा बजाऊन सुद्धा आरोग्य प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तसेच आमचे कनिष्ठ अभियंता स्वत: अनेकदा विअद्याकीय अधिकारी डॉ. गजानन भारती यांना भेटूनही वीज देयक न भरल्यामुळे आज ग्रामीण रुग्णालय म्हसळा चा वीज पुरवठा खंडित करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गवळी यांनी फोन द्वारे वीज देयक भरण्याचे आश्वासन दिले तेव्हाच रुग्णालयाचा वीज पुरवठा तात्पुरता पूर्ववत करण्यात आला आहे.
यादव साहेबराव इंगळे, उप अभियंता , महावितरण , म्हसळा
काही तांत्रिक बाबींमुळे सदरचे वीज देयक आरोग्य विभागाकडून बाकी आहे. सदर तांत्रिक बाबी वरिष्ठ कार्यालयाकडून सोडविण्याचा प्रयत्न सुरु असून सादर बिलाची रक्कम प्राप्त होताच अदा करण्यात येईल. तूर्तास मी स्वतः महावितरण च्या अभियंतत्याशी चर्चा करणार आहे.
डॉ. मधुकर ढवळे , प्रभारी वैद्यकीय अधीक्षक , ग्रामीण रुग्णालय म्हसळा
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा देत असून त्यातून मिळणारे उत्पन्न रुग्ण कल्याण समिती च्या बँक खात्या मध्ये जमा होतो. वास्तविक पाहता सदरचे वीज बिल हे रुग्ण कल्याण समितीने भरणे गरजेचे होते. याबाबत संबधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष यांचा हलगर्जीपणा दिसून येत असून रुग्णांच्या जीवाशी खेळ चालला आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही.
कृष्णा कोबनाक , भाजप उप जिल्हा अध्यक्ष , रायगड

Post a Comment