माणगांव - प्रवीण गोरेगांवकर
समाज प्रवाहामध्ये आर्थिक व सामाजिकदृष्ठ्यामागे राहिलेल्या कातकरी (आदीवासी) समाजास शासकीय सेवा सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने व या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विभागिय आयुक्तांकडील निर्देशानुसार माणगांव तालुक्यात कातकरी उत्थान अभियान कार्यक्रम नुकताच माणगांव तालुक्यातील मोर्बा उर्दू हायस्कुलमध्ये संपन्न झाला. यावेळी माणगांव तहसिलदार श्रीम. उर्मिला पाटील, महसूल नायब तहसिलदार दिवकर, पुरवठाविभाग मोर्बा तलाठी भागोराव बासंबेकर, देगांव तलाठी शिल्पा पवार, साई तलाठी श्री. पवार, सर्वोदय विकास संस्थेचे भाऊसाहेब सापटे, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह सुर्ले, नाईटणे, महादपोली, देगांव, रिळे, पाचोळे, साई आदीवासीवाडीतील आदीवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणगांव तालुक्यात 91 आदीवासी वाड्या असून त्यांची कुटूंब संख्या सुमारे 3560 तर लोकसंख्या साधारणपणे 13000 इतकी असून प्रत्येक वाडीसाठी तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व आरोग्य सेवक यांचे आदिवासी वाडीनिहाय 91 पथक तयार करणेत आलेले आहेत. या अभियांनाकरीता तालुक्यातील एकूण 123 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांचे मार्फत प्रत्येक कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी माणगांव यांच्या मार्गदर्शनानुसार तहसिल कार्यालय माणगांव येथे तहसिलदार माणगांव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रिय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. कातकरी समाजबांधवाच्या सर्वांगिण विकासासाठी सदरचे अभियान यशस्वी होण्याच्या दृष्ठीने तालुका स्तरावर पुर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. या नियोजनला अनसरून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलतांना माणगांव तहसिलदार सौ. उर्मिला पाटील यांनी, शासन आपल्या उत्थानासाठी खुप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यासाठी अशासकीय सामाजिक संस्था व शासनाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत. त्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे देण्यासाठी जास्तीतजास्त मदत करा असे सांगत त्यांनी आदिवासी बांधवाना सक्षम होण्याचे आवाहन केले. यावेळी 130 जातीचे दाखले, 40 रेशनकार्ड, 30 उत्पन्नाचे दाखले, 60 सातबारा पत्रके यांचे वाटप करण्यात येऊन 150 नविन फॉर्म भरून घेण्यात आले. याचवेळी आरोग्य तपासणी शिबीर घेऊन आरोग्य तपासणी, रक्त तपासणी व हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.

Post a Comment