-सुवर्णा गाणेकर
आमचं गाव तसं छोटंसं पण सण समारंभ अगदी दणक्यात साजरा करणारं !! शिवजयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतर सालाबादप्रमाणे महिला मंडळाचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सुरू होता.त्यामध्ये कोणी बायका हळद कुंकू लावण्यात कोणी गुलाबाची फुलं देण्यात तर कोणी फराळ वाटप करण्यात गुंग होत्या.बसलेल्या बायकांमधून मध्येच आवाज आला अग ये सरु हा गुलाब बदलून दे पूर्ण सुकला आहे.त्यात माझी बहिण सुद्धा हा गुलाब बदलून कळी असलेला दे मला खूप आवडतो असं म्हणाली.बिचारी गुलाबाची फुलं देणारी खूप गोंधळून गेली होती,त्यानंतर काही जणी तिच्या ताटात हात घालून आपल्याला हवा असलेला गुलाब निवडत होत्या.
मी हे पाहत असताना मागून फराळ वाटणाऱ्या बाईला उद्देशून आवाज आला अग ये मालती माझ्या बायला एक प्लेट दे .ती हीच बायो जिला कुठल्याही गोष्टींचा गंध नसलेली,गावातल्या कोणत्याही कार्यक्रमांना हजार न राहणारी मग हिच्यासाठी आपल्या प्लेट मधील थोडासा भाग देऊ शकत नव्हती ? त्यासाठी एवढया माणसात पुन्हा फराळाचा प्लेट मागण्याची काय गरज ?
असो एखाद्याचा स्वभाव आणि काय ? पण मी विचारच करू लागले की,म्हणजे बघा कुणी गुलाबाच्या फुलांसाठी,फराळाचा प्लेटसाठी तो चांगला मिळावा,जास्त मिळावा यासाठी धडपडत असतो.पण हळदी कुंकू लावणाऱ्या बाईकडे कोणाची तक्रार नसते.चुकून ते जर लावायचे राहिले तरी कोणी मन मोठे करून म्हणत नाही की ताई मला हळद कुंकू लावायला विसरलीस मला ते लाव कारण मी त्याचसाठी बसले आहे.
सुकलेला किंवा खराब झालेला गुलाब मिळालं की तो बदलायला सांगतो परंतु त्या सुकलेल्या गुलाबालासुद्धा मन असतो तो सुद्धा आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे म्हणून अतोनात प्रयत्न करतो.जसं की मेणबत्ती ज्यावेळी जळून आपली जीवनयात्रा संपवते म्हणजे ती मेणबत्ती दुसऱ्याला प्रकाश देऊन आपले जीवन उज्ज्वल ठरवते.तद्वतच एखादे फुल आपण झाडापासून अलग करतो किंवा तोडून आणतो तेव्हा ते फुल देव्हाऱ्यात किंवा एखाद्याच्या केसांमध्ये जातो तेव्हा त्या फुलाचे जीवन सार्थकी लागते.आपल्या जीवनाचेही असेच आहे स्वतः साठी जगताना इतरांसाठी जगलो तर जीवन धन्य होऊन जाते.
या सगळ्याचा विचार चालू असतानाच माझ्या हातात ज्या ज्या वस्तू आल्या त्या त्या मी आनंदाने स्वीकारल्या.....

Post a Comment