विनायक जाधव,
म्हसळे तालुक्यातील दुर्गम विभागात वसलेल्या तळवडे पंचक्रोशित कोंझरी, कुंभळे, कोंढे, पानवे, कोळे, आडी इत्यादी गावांचा समावेश आहे. या सहा गावांकरीता तळवडे येथे जे. बी. सावंत शिक्षण संस्थेचे एकमेव हायस्कुल असून माध्यमिक शिक्षणाची सोय आहे.
सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षाची परंपरा असलेल्या या हायस्कुलमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. परंतू अलीकडे या हायस्कुलमध्ये विशेषतः इंग्रजी विषयांच्या शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. आठवड्यातून फक्त दोन दिवस इंग्रजी विषयासाठी बाहेरून शिक्षक येतात त्यामुळे बरेचसे विद्यार्थी स्कुल अंतर्गत परीक्षेत इंग्रजी विषयात नापास झालेत असे पालकांचे म्हणणे आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने हायस्कुलचे हेड सर श्री बढे यांचेकडे विचारणा केली असता, शिक्षकांची कमतरता नसून दहावीच्या विद्यार्थ्यांना आणखी चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून बाहेरून शिक्षक मागवितो असे सांगून वरील वृत्ताचे खंडन केले.
तळवडे गावचे आदरणीय व्यक्तीमत्व, सामाजिक - राजकीय नेते श्री राजेंद्र विचारे यांना प्रतिक्रीया विचारली असता या वृत्ताला दुजोरा दिला. स्कुल चाचणी परीक्षेत इंग्रजी विषयात बरेच विद्यार्थी नापास झाल्याचे सांगितले. दहावीची परीक्षा ऐन तोंडावर आल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
जे. बी. सावंत शिक्षण संस्थेचे विश्वस्त नाना सावंत यांनी वस्तुस्थिती सांगताना म्हटले की, शिक्षकांची कमतरता ही बाब खरी असून सध्याच्या सरकारने अवलंबिलेली शिक्षण पध्दती कारणीभूत आहे. पटसंख्येच्या नावावर सरकार शिक्षक कमी करण्यास भाग पाडीत आहे. अशाने हळूहळू संस्था बंद होऊन, खाजगी संस्थाना मोकळे रान मिळेल.
एकंदर परिस्थिती पाहता गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊ नये असा सरकारचा विचार आहे असे वाटते. पैसेवाले शिक्षण विकत घेतील पण गरीब विद्यार्थ्यांचा वाली कोण? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

Post a Comment