२१ वे शतक म्हणजे संगणकाचे युग.या युगात मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये आणखी एक गरज वाढली ती म्हणजे भ्रमण ध्वनी ( mobile ) .या मोबाईल मुळेच माणसे घडली आणि बिघडली सुद्धा ;पण या मोबाईलमुळे काही माणसे इतकी जवळ आली आहेत; की त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमची काल दि.१६ डिसेंबर २०१७ रोजी तब्बल २८ वर्षांनी झालेली आमच्या पहिलीच्या कणगुटकर बाई यांची भेट.. खरोखरच अगदी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा क्षण.
फेसबुक ( facebook ) एकमेव कारण ठरले आणि बाईंचा मुलगा , आमचा वर्गमित्र अमित भेटला. साधारण १९८९- ९० चा काळ जेव्हा आम्ही पहिलीत होतो ; पण इतक्या वर्षांनी भेटलेला मित्र पाहून आनंद गगनात मावेना…. मग काय राव आमची मैत्री पुन्हा एकदा बहरास आली . तासंतास गप्पा,चॅटिंग धम्माल सुरू झाली आणि सहज त्याच्या आईचा म्हणजे आमच्या बाईंचा विषय निघाला… अहो आश्चर्यम !! तो म्हणाला, मी आईला सगळं सांगितले आहे. लागलीच आम्हाला बाईंना भेटण्याचे वेध सुरू झाले..आमचे नशीब बलवत्तर…..बाईंना भेटणार या जाणिवेने आम्ही सगळेच विद्यार्थी ( batch ) वेडावून गेलो.भेटीचे योग जुळून आले आणि कालचा दिवस डन झाला. मिळेल त्या गाडीने,बसने,कोणी बोटीने अमितने दिलेल्या पत्त्यावर बाईंच्या घरी पोहोचलो.
बाईंना पाहताच डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले आमच्या बाई सुद्धा अक्षरशः रडल्या. बाईंनी सुरुवातीला आमची हजेरीच घेतली.गप्पांना उधाण आले,बाईंनी खास आमच्यासाठी जेवण बनविले.शाळेतल्या मधल्या सुट्टीची आठवण झाली आणि बाई आम्हाला एकत्र घेऊन जेऊ लागल्या.फारच सुंदर मी तर कल्पनेत रममाण झालो.पुन्हा एकदा आमच्या गप्पाष्ठकांमध्ये भर पडू लागली . त्यातच बाईंनी आम्हाला सांगितले, की अमितच्या बाबांचे छत्र हरविले आहे , फारच वाईट वाटले काहीतरी हरविल्यासारखे वाटले; पण बाईंनी आम्हाला पुन्हा एकदा शाळेच्या आठवणीत व्यस्त केले.
शेवटी आम्ही सोबत नेलेली बाईंना एक आठवण भेट दिली. बाईंसोबत खूपच फोटो निघाले.निघण्याची तयारी सुरु झाली आणि अंतःकरण जड झाले. घरातून पायबाहेर निघायला तयार होत नव्हते; पण बाईंनीच हट्ट केला व म्हणाल्या , तुम्हाला घरी जाण्यास उशीर होईल जा रे बाळांनो!! …डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. परतीचा प्रवास सुरु झाला मात्र शाळेतील बाईंना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या मनामनातून ओसंडून वाहत होता.अशी आमची अविस्मरणीय भेट जी २८ वर्षांनी आमच्या बाई श्रीमती कनगुटकर यांच्याशी झाली.अशाप्रकारे इयत्ता पहिली सन १९८९ – ९० ते इयत्ता चौथी सन १९९२- ९३ आमचा शालेय प्रवास जो आम्ही बाईंसोबत केला.

Post a Comment