म्हसळा शहरात पार्किंगची समस्या गंभीर :वाहनतळ उभारण्याची नागरिकांची मागणी...



मेंदडी  (हेमंत पयेर) :
म्हसळा शहराच्या विस्ताराबरोबर व्यापारी संकुलाचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली असूूून अगदी वर्दळीच्या आणि राज्य मार्गावर व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु बांधकाम करताना कुणीही पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष दिले नसल्याने शहरात पार्किगची समस्या गंभीर झाली आहे. यामुळे शहरातील  प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असूूून नगरपंंचायतीसह वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहे.श्री क्षेत्र हरिहरेश्वर,श्रीवर्धन,सुवर्ण गणेश मंदिर आणि दिघी करिता जाणाऱ्या पर्यटकांसाठी म्हसळा हा मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हसळा शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. त्याचप्रमाणे शहरात मोठी शाळा, कॉलेज असल्यामुळे शालेय विद्यार्थीही या समस्येत भरडले जातात. वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक संतप्त झाले असून योग्य उपाययोजनेची मागणी होत आहे.

म्हसळ्याची बाजारपेठ मोठी असून ती अरुद आहे.विविध दुकाने असल्याने या परिसरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात.अलिकडे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. ग्राहक आपल्या वाहनाने दुकानात येतात. परंतु वाहन उभे कुठे करावे, असा प्रश्न असतो. एखाद्या दुकानात खरेदीसाठी जायचे असल्यास पहिला प्रश्न वाहन पार्किंगचाच येतो. अनेकदा नागरिक रस्त्यावर वाहने पार्किंग करून दुकानात जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशातच एखादे अवजड वाहन आल्यास तानस्तास वाहतूक खोळंबते व वाहनाच्या रांगा लागतात. पुरेसे वाहतूक पोलीस नसल्याने हातगाडी, रिक्षा, मिनीडोर, मोटारसायकल यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. यामुळे बाजारपेठेत रिक्षा, मिनीडोर यांचे जिथे प्रवासी हात दाखवेल तिथे स्टॉप अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळेही दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. मनमानेल त्या पद्धतीने वाहने उभी असतात.नगरपंचायत पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.



चारचाकी, दुचारी वाहनांतून प्रवास करणे जिकिरीचे व त्रासदायक झाले आहे. वाहन कुठे उभे करायचे हा यक्षप्रश्न आहे. वाढती गर्दी, वाहतूक, अरुंद रस्ते,  वाढते बांधकाम यामुळे रस्ता कोठे हरवला आहे, हे समजणेच कठीण होऊन बसले आहे.        --वाहनचालक


पार्किंगला हवी जागा- 

तरुणांकरवी बेफाम व जीवघेण्या पद्धतीने चालविल्या जाणा-या दुचाकींना आवर घालण्याची गरज आहे.मुळात दुचाकीस्वारांना शिस्त लावणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.शहरात पार्किंगचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.पार्किंगच्या सोयींबरोबरच ती जागा मोकळी राहण्यासाठी यंत्रणेने दक्ष राहणेही गरजेचे आहे.
------ नागरिक


पे अँड पार्कची सुविधा निर्माण करावी :-


 नगरपंचायत,पोलिस यंत्रणा व लोकसहभागातूनच शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल.प्रशासकीय यंत्रणेच्याही प्रत्यक्षात काही अडचणी,काही मर्यादा आहेत.नागरिकांनी स्वत:ला शिस्त लावली,तर काही प्रमाणात प्रश्न निश्चितच सुटू शकतील.त्यासाठी मी माझ्या घरापासून वाहतूक शिस्तीबाबत सुरुवात केली पाहिजे.शहराला योग्य नागरनियोजन नाही त्यामुळे मोकळ्या जागेवर पे अँड पार्क सारखी योजना राबविल्यास नागरपंचायतीस उत्पन्नचा स्रोत मिळेल व नागरिकांची सोय होईल ---- के.अनिल - वास्तुविशारद व नगररचनाकार 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा