घुम - श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते वाहतूक व दळणवळण व्यवस्था अशा वेगवेगळ्या विषयांच्या नागरी सेवा सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे समोर येत असतानाच आता पाणी पुरवठा विभागाच्या अनेक गावागावातील नळ पाणी पुरवठा योजनांचा खेळखंडोबा झाला असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा पाणी पुरवठा विभागाची आढावा सभा दि.२१ नोव्हेंबर २०१७ रोजी पंचायत समिती म्हसळा सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदर सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या समवेत पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, जिप सदस्या धनश्री पाटील, पक्षाचे नेते अलीशेठ कौचाली, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाझीम हसवारे, उपसभापती मधुकर गायकर, पं.स.सदस्य संदिप चाचले, पस सदस्या छाया म्हात्रे, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, गटविकास अधिकारी वाय.एम प्रभे, विस्तार अधिकारी डि.एन.दिघीकर, पाणी पुरवठा उपअभियंता युवराज गांगुर्ड, सरपंच अंकुश खडस, अशोक काते, लक्ष्मण कांबळे, सतिश शिगवण, प्रकाश गाणेकर यांसह पाणी पुरवठा विभाग व पंचायत समिती कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सांगितले की नागरिकांना चांगले व सुस्थितीत पाणी पुरवठा सुविधा पुरविणे हे शासनाचे काम आहे त्यासाठी तालुक्यात काम करणारे अधिकारी, कर्मचारी व जिल्हा परिषद मधील अधिकारी व अन्य संबंधित कर्मचारी यांनी आपल्या जबाबदारीचे भान ओळखून काम केले पाहिजे. तसेच तालुक्यातील नागरिकांना चांगला सुस्थितीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून आमदार सुनिल तटकर साहेबांनी मंत्री असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अनेक गावागावातून लाखो रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत. पण दुर्दैवाने या योजनांचे काम ज्या ठेकेदारांनी घेतले आहेत त्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे आणि पाणी पुरवठा विभाग व संबंधित गावाच्या पाणी कमिटी यांचे नियंत्रण नसल्याने या योजना अपूर्ण राहिल्या आहेत असे सांगून अपूर्ण योजना व अन्य विहिरींच्या कामासंदर्भात जिल्हा परिषद मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कामात गैरवर्तणुक किंवा कामचुकारपणा केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
म्हसळा पाणी पुरवठा विभागात नव्यानेच कार्यरत झालो असल्याने याठिकाणी गावागावात झालेल्या व अपूर्ण असलेल्या पाणी पुरवठा योजनांची सविस्तर माहिती घेऊन त्या संदर्भातील माहिती जिल्हा पाणी पुरवठा विभाग व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना सादर करण्यात । येईल. तसेच ज्या गावातील योजनांमध्ये तांत्रिक त्रुटी असतील त्या लवकरात लवकर दूर करून त्यासंबंधी कार्यवाही करण्यात येईल.
- श्री. युवराज गांगुड़े
उपअभियंता पाणी पुरवठा विभाग म्हसळा
तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांवर चर्चा करताना पाभरे, सुरई, ढोरजे, गोंडघर, आंबेत, खामगाव, लेप, तुरुंबाडी, रुद्रवट, तोराडी बंडवाडी, मेंदडी कोंड अशा अनेक गावातील राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना अशा नळपाणी पुरवठा योजना अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
Post a Comment