म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालुक्यातील आंबेत हद्दीतील गोरेगाव – मंडणगड मार्गावर म्हसळा वनखात्याकडून एका खैर तस्करास अटक करण्यात आली. सदर आरोपीला श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता त्या आरोपीची न्यायालयाने १५ दिवसा करिता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की वाहन क्रमांक एम.एच. ०६ बीजी १३६४ हे पिक अप वाहन विना पास सोलीव खैर भरून गोरेगाव रस्त्यावरून मंडणगड येथे जात असताना आंबेत हद्दीत म्हसळा वन खात्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून सोमवार दि २० नोव्हेंबर रोजी रात्रौ ११.३० वा. पकडले. सदर वाहनामध्ये सोलीव खैराचे १४५ नग(रु. १७,९०० किमतीचे) हस्तगत करण्यात आले व वाहन मालक महेश यशवंत कासारे , वय.२९ वर्षे, रा. गोवळ, पो. लाटवण, ता. मंडणगड , जि. रत्नागिरी यास म्हसळा वनखात्याने अटक केली व त्याच्यावर भारतीय अधिनियम १९२७ चे कलम ४१ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ३१,८२ चे उलंघन करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी आरोपीला श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत धाडले.व पुन्हा २३ नोव्हे. रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसाकरीता त्या आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार म्हसळा तालुक्यात खैर तस्करांची मोठी टोळी सक्रीय आहे. तस्करांसाठी तालुक्यातील काही लोक खैर तोडीसाठी माणसे पुरवितात. यात बऱ्याचदा गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलांचा वापर होतो. जेणेकरून वनविभागाने यांच्यावर कारवाई केली तरी कारवाई मध्ये हि मुले अल्पवयीन असल्याने मर्यादा येतात व या तस्करीतील मोठे मासे सापडतच नाहीत. सदरची कारवाई उप वनसंरक्षक रोहा, सहाय्यक वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा वनखात्याचे वनक्षेत्रपाल व्ही. एन. पवळे, एस.जी म्हात्रे(वनपाल मांदाटणे), एस.एस. चव्हाण(वनरक्षक, आंबेत), ए.बी. आहिरे(वनरक्षक, पांगलोली), बनसोडे(वनरक्षक सरवर) या पथकाने कारवाई केली. या कारवाईत आंबेत पोलीस चौकीवरील पोलीस हवालदार वळंजू , पोलीस शिपाई रिठे यांनी मोलाचे सहकार्य केले.
पुढील सहभागी आरोपींचा लवकारात लवकर तपास करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व सदर आरोपींचा इतर वनगुन्ह्यात सहभाग आहे का याबाबत तपास करण्यात येईल.
व्ही.एन. पवळे, वनक्षेत्रपाल , म्हसळा
Post a Comment