समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने पिक-अप झाडावर आदळली , वाहन चालकासह पाच जण जखमी.
देवघर – म्हसळा येथील घटना
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालुक्यातील देवघर येथे
माणगाव-म्हसळा मार्गावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने
पिक-अप हे चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडावर आदळले. या
अपघातामध्ये पाच जण जखमी झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिक-अप
क्रमांक एम.एच. ०६ बीजी -४९६८ हे वाहन नेहमी प्रमाणे भाजी भरून पुणे येथून
वडवली, ता. श्रीवर्धन ला जात असताना देवघर, ता. म्हसळा येथे माणगाव-म्हसळा
मार्गावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. यामुळे वाहन
चालक विकास शंकर आगरी याने पिक-अप गाडीला त्याच वेगात डाव्या बाजूला
नेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर ती गाडी आदळून अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की सदर पिक-अप वाहनाच्या दर्शनीय भागाचे मोठे नुकसान
झाले होते. सदर अपघातात वाहन चालकासह गाडीत बसलेले सौरभ कांबळे, प्रदीप
कांबळे, अजिंक्य नाक्ती, बाळाराम काशिनाथ नाक्ती सर्व रा. वडवली, ता.
श्रीवर्धन हे पाच जण जखमी झाले. जखमीना ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे
उपचाराकरिता नेण्यात आले होते. सदर अपघाताची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात
करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार सुखदेवे करीत आहेत.
Post a Comment