दिघी : गणेश प्रभाळे,
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी हरवलेल्या
मुलाची त्याच्या आईशी भेट घडवून दिली आहे. शुक्रवारी ता. १७ रोजी ही घटना
घडलेली शुक्रवारी सायंकाळी निहाल नारायण मांदारे हा मुलगा दिवेआगर फाटा
परिसरात हरवलेल्या स्थितीत आढळून आला. स्थानिकांनी लगेच दिघी सागरी
पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाकडे विचारणा केली. मात्र
घाबरलेल्या अवस्थेत असल्याने मुलाला कोणतीच माहिती देता आली नाही. दिघी
सागरी पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या
मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार सचिन येरूनकर तसेच महिला पोलिस कर्मचारी
मनीषा नारखेडे व संजना चव्हाण यांना तत्काळ सूचना देऊन बोर्लीपंचतन
बाजारपेठेत मुलाच्या आईवडिलांचा शोध घेतला. बाजारपेठेत चौकशी केली असता
मुलाच्या घरच्यांचा शोध लागला. पोलिसांनी मुलाच्या आईची व आजीची ओळख पटवून
मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. या वेळी त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांचे
आभार मानले. खरसईच्या रहिवासी असलेल्या संपदा मांदारे या मुलासह बोर्ली येथे
माहेरी आल्या होत्या. खेळता खेळता मुलगा चुकीच्या गल्लीत जाऊन वाट हरवला
होता. खाकी वर्दीतील दिघी सागरी पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीच्या
कर्तृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
Post a Comment