म्हसळा तालुक्यातील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध...

घुम : श्रीकांत बिरवाडकर,
रायगड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची अवस्था कोलमडली असून, आरोग्य विभागाकडून ही परिस्थिती  सुधारण्यासाठी योग्य नियोजन सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यातील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती नरेश पाटील यांनी म्हसळा येथे आयोजित आरोग्य विभाग आढावा सभेला संबोधित करताना केले आहे.  यावेळी सभेला आरोग्य व शिक्षण सभापती नरेश पाटील यांच्या समवेत पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, जि.प. सदस्या धनश्री पाटील, गटविकास अधिकारी वाय.एम. प्रभे, अनिल बसवत, सतिश शिगवण यांसह प्राथमिक आरोग्यकेंद्र व उपकेंद्र डॉक्टर, कर्मचारी उपस्थितीत होते.  यावेळी सभेमध्ये तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाच्या आरोग्य विषयक विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त पदे, मुख्यालयी राहणारे अधिकारी व कर्मचारी, बंद असलेले उपकेंद्र, केंद्रनिहाय प्रसुती माहिती, कुटुंब कल्याण कार्यक्रम पात्र जोडपी व शस्त्रक्रिया झालेली जोडपी, मलेरिया, कुष्ठरोग आणि क्षयरोग रुग्ण व औषधोपचार, साथरोग व उपाययोजना, पाणी गुणवत्ता, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम, जननी सुरक्षा, जननी- शिशु सुरक्षा, आशा स्वयंसेविका, राष्ट्रीय बाल स्वास्थ व किशोर स्वास्थ कार्यक्रम, मोबाईल मेडिकल युनिट, दैनंदिन बाह्य व अंतरुग्ण संख्या, औषध साठा, बांधकाम आढावा अशा विषयांवर चर्चा करुन सविस्तर माहिती घेण्यात आली. आरोग्य सहाय्यक महेश पाटील यांनी तालुक्याचा आरोग्य आढावा उपस्थितांसमोर सादर केला. यावेळी आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी सांगितले की नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा पुरविणे हे शासनाचे काम आहे त्यासाठी ज्या दवाखान्यात काम करणारे अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक-सेविका अन्य संबंधित कर्मचारी यांनी आपल्या जबाबदारीचे भान ओळखून काम केले पाहिजे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे असून, सेविकांनी घरोघरी जाऊन महिला, किशोरवयीन मुली, गरोदर महिला, माता, लहान मुले यांची तपासणी करणे आवश्यक आहे. आरोग्य सेवक व सेविका या ग्रामीण भागातील नागरिक आणि आरोग्य यंत्रणेच्या दुवा असतात त्यामुळे आरोग्य सेविकांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे तसेच आरोग्य सेविका यांनी उपकेंद्रांच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही अधिकारी, डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी यांनी कामात गैरवर्तणुक किंवा कामचुकारपणा केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ज्या उपकेंद्रांची इमारती बंद आहेत त्यांची सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. तालुका आरोग्य कमिटी स्थापन करण्यात आलेली नाही यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला असता दोन दिवसांत कमिटी स्थापन करण्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना व अधिकान्यांना सूचना सभापतींनी दिल्या. म्हसळा तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र असून एकाही केंद्रात ऑपरेशन थेटर सध्या सुरु नाही त्यामुळे नागरिकांना सेवा देताना अनेक गैरसोयी निर्माण होत आहेत त्यामुळे येत्या काही महिन्यातच म्हसळा येथील मध्यवर्ती आरोग्य केंद्रात एक तरी ऑपरेशन थेएटर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सभापती नरेश पाटील यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा