‘प्रदूषण मुक्त दिवाळी’ अभियानाला नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद , अनेकांनी फटाक्यांचा मनमुराद आनंद लुटला...

म्हसळा : सुशील यादव
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दिल्ली मध्ये फटाके विक्रीस बंदी आहे तर मा. मुंबई उच्च न्यायालयाने  राज्यभरातील निवासी वसाहतीमध्ये सुरक्षा कारणावरून फटाके विक्रीला परवानगी न देण्याचे स्पष्ट आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळातील शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथच दिली व ‘प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान’ राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचे ठरविले. परंतु प्रत्यक्षात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ‘नरकचतुर्दशी’ च्या दिवशी अनेक लहान थोरांनी रंगी-बेरंगी शोभेचे , कानठळ्या बसणाऱ्या फटाक्यांचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रदूषण मुक्त दिवाळी ची शपथ हि फक्त शपथ घेण्यापुरतीच राहिली असे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते. दिवाळी म्हटली की पहाटे ‘अभ्यंगस्नान’’ लाडू, करंज्या , चकली , शंकरपाळ्या, अनारसे असा आईने बनविलेला चमचमीत फराळ, दारासमोर कंदील, पणत्या आणि त्या कंदिल-पणत्यांच्या रोषणाई खाली काढलेली सुंदर रांगोळी. नवीन नवीन कपडे घालून नातेवाईक , मित्रांच्या भेटीगाठी आणि भरपूर फटाके वाजविणे हा या सणाचा वर्षानुवर्षे ठरलेला साचा. यात बदल नाही. परंतु ‘प्रदूषण मुक्त दिवाळी’ अभियानांतर्गत या साचातील फटाके हा विषय वगळला आहे आणि तो अंगवळणी पडावयास काही कालावधी लागेलच हेच या वर्षीच्या दीपावली सणात राज्यातील नागरिकांनी दाखवून दिले आहे.


‘प्रदूषण मुक्त दिवाळी’ ही संकल्पना वाढते प्रदूषण पाहता योग्यच आहे. पण कुठे ? जिथे प्रदूषणाचा स्तर प्रचंड प्रमाणात वाढला आहे तिथे. मुंबई, पुणे , दिल्ली या शहरांमध्ये वाढती वाहने , रासायनिक कारखाने यामुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढला आहे. याचे कारण त्या त्या शहरात राहणारे बेजबाबदार नागरिकच आहेत. एक कुटुंबात चार जण रहात असतील तर प्रत्येकाचे एक याप्रमाणे चार वाहने एकाच घरात असतील आणि एकाच वेळी अशी लाखो वाहने जर रस्त्यावर धावत असतील तर साहजिकच प्रदूषण हे वाढणारच ! आणि त्यात फटाक्यांची भर पडल्यास प्रदूषणाचा स्तर आणखी वाढेल.त्यामुळे या मोठ्या शहरातील बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांनी आपला फटाके वाजविण्याचा हक्क कधीच गमावलाय. परंतु आम्हा खेड्या ठिकाणी राहणाऱ्याना तुलनेने फारच कमी प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी तरी दीपावलीचा आनंद काही प्रमाणात फटाके वाजवून घेऊ द्या. आणि पुढे पुढे आपण जसे समाज प्रबोधन करू तसे येणारी पिढी हि 'प्रदूषण मुक्त दिवाळी' कडे आपोआपच झुकलेली दिसेल.
सचिन करडे , संस्थापक अध्यक्ष , गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान 

तिमिराकडून तेजाकडे नेणारा तसेच दुष्प्रवृतींचा नाश हा खरा या सणाचा उद्देश आहे. पण संपूर्ण वातावरणात मिसळलेला जीवघेणा धूर, धूळ आणि कानाचे पडदे फाडणारे कर्णकर्कश आवाज करणार्‍या फटाक्यांची आ‍तषबाजी करुन हा सण साजरा करण्याचा मार्ग कुठला हे कळत नाही. आवाज न करणार्‍या फुलबाजी, सुरसुर्‍या, टिकल्या, अनार हे लखलखीत प्रकाश देणार्‍या फटाके वाजविणे हे एकवेळ समजू शकते, पण फटाक्यांचा तोफा डागणे हे मात्र आपण टाळलेच पाहिजे.
किशोर मोहीते , अंधश्रद्रधा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष , शाखा - म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा