मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सूरु, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासात...


अभि म्हात्रे,
मेरिटाईम बोर्डाने भाऊचा धक्का(मुंबई) ते दिघी(रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतूर्दशीच्या मुहूर्तावर सुरु करुन कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.
रायगड -  एसटी कर्मचारी संघटनेने मंगळवार पासून पुकारलेल्या संपाच्या पाश्वर्भूमीवर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने भाऊचा धक्का(मुंबई) ते दिघी(रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतूर्दशीच्या मुहूर्तावर सुरु करुन कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बुधवारी दिघी पर्यंत आलेली ही बोट गुरुवारी धक्का(मुंबई) - दिघी(रायगड) आणि पूढे रत्नागीरी जिल्ह्यात दाभोळ पर्यंत सुरु प्रवासी सेवा देणार असून परतीचा प्रवास देखील दाभोळ-दिघी-भाऊचा धक्का असा असेल अशी माहिती मेरिटाईम बोर्डाचे बंदर निरिक्षक अतूल धोत्रे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली आहे.

मेरिटाइम बोर्डाने डेल्टा मेरिटाइम अँड इंडस्ट्रीयल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटी आणि विंध्यवासिनी मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या एमव्ही केपीएस या बोटीला मुंबई ते दिघी, दिघी ते दाभोळ आणि दाभोळहून दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. या बोटसेवेचे वेळापत्रक बोर्डाच्या https:// mahammb.maharashtra.gov.in या वेबसाइटवर देण्यात आले आहे. मुंबई ते दिघी या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३३० रु. आणि मुंबई ते दाभोळसाठी प्रति प्रवासी ६६० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवासांना पूर्वकल्पना नसल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद  मिळाला. बुधवारी दोन प्रवाशांनी धक्का(मुंबई) ते दिघी(रायगड) या सागरी प्रवासी सेवेचा लाभ घेतला.गुरुवार पासून प्रवासी संख्येत वाढ होईल अशी माहिती दिघी बंदराचे अधिक्षक अरविंद सोनावणे यांनी दिली.

बुधवारी  केपीएएस ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दुपारी दीड वाजता दिघीला पोहोचली. गुरुवार दि. १९ ऑक्टोबर रोजी  शिवम ही बोट स. ८ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. १२.३० वाजता दिघीला पोहोचेल. रावी ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्कायेथून निघून दु. दीड वाजता दिघीला पोहोचेल, तर दिघीहून दु. २.३० वाजता निघून रा. ७ वाजता मुंबईला पोहोचेल. केपीएस ही बोट स. साडेदहा वाजता भाऊचा धक्काहून निघून दु. ३ वाजता दिघीला पोहोचेल. तर दु. ४ वा. दिघीहून निघून रा. ८.३० वा. मुंबईला पोहोचेल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा