म्हसळा शहरात बनावट मद्य विक्री ..? जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी तळीरामांच्या जीवाशी खेळ, दिव-दमण वरून येते बनावट दारू

म्हसळा : सुशील यादव

म्हसळा शहरात अवैध मद्यविक्री सुरु आहेच परंतु बनावट मद्य विक्रीमधून जास्तीत जास्त नफा कमाविण्यासाठी हे अवैध दारू विक्रेते तळीरामांच्या जीवावर उठल्याचे चित्र आज म्हसळा शहरात दिसत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार १ एप्रिल २०१७ पासून देशातील  राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग पासून ५०० मीटर अंतरामधील सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने बंद अवस्थेत आहेत. त्या दिवसापासून अवैध धंदा करणाऱ्यांची मात्र चंगळ झाली आहे. म्हसळा शहरात, व शहरालगत एकूण ४ परमिट रूम व बीयर बार , २ देशी दारू दुकान , २ बियर शॉपी अशी एकूण आठ दारूची दुकाने एक एप्रिल पासून बंद अवस्थेत आहेत. याचाच फायदा घेऊन अवैध धंद्यांची मुळातच सवय असणाऱ्या समाजकंटकानी आपापल्या घरातच दारूची दुकाने थाटली आहेत. गल्ली गल्लीत , पानगादी , दुकानांवर दारू सहजपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातील गडगंज नफा पाहून काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी देखील अवैध दारू विक्रीचा मार्ग अवलंबिला आहे. एखाद दुसरे धाडसत्र वगळीता पोलीस, राज्य उत्पादन शुल्क खाते देखील या अवैध दारू विक्रेत्यांचे काही वाकडे करू शकले नाहीत. म्हसळयापासून फक्त ५५ किमी अंतरावर महाड येथून वाईन शॉप मधून आलिशान कार, एस.टी. बस मधून देशी-विदेशी दारू आणायची व दिमाखात याची राजरोसपणे विक्री करायची, हा अवैध दारू विक्रेत्यांचा नित्यक्रमच बनला आहे. यामध्ये साखळी पद्धतीने काम होते. पहिला याना महाड येथून आपले प्रशासनामधील अनैतिक संबध वापरून दारूचा माल स्वतःच्या खाजगी कारने आणून देतो, दुसरा आपल्या माणसांना किरकोळ विक्रीसाठी दारूचा माल देतो व तिसरा आपल्या घरी , दुकानांमध्ये व वेळ पडली तर घरपोच देखील दारू पुरवितो आशा पद्धतीने हा अवैध मद्य विक्रीचा गोरखधंदा चालतो. यामध्ये सुरुवातीला एका १८० मिली. विदेशी दारू मागे रु. ८० ते १०० नफा या अवैध दारू विक्रेत्याला मिळत असे. यामध्ये पहिल्याला या नफ्यापैकी रु.४० , दुसऱ्याला रु २० – ३० तर तिसऱ्यालां रु. १० – २० मिळतात. परंतु हा नफा देखील माफक वाटणाऱ्या या अवैध दारू विक्रेत्यानी चक्क बनावट दारू आणण्यास सुरुवात केली आहे. दिव-दमण व अन्य काही ठिकाणचे दारू विक्रेते या अवैध दारू धंदा करणाऱ्याना हे बनावट मद्य पुरविण्यास सुरुवात केली आहे असे खात्रीलायक वृत्त आहे .या बनावट १८० मिली. मद्य विक्रीतून तब्बल रु. १८० – २०० नफा मिळत आहे. महाड येथून आणल्या जाणाऱ्या मद्यापेक्षा बनावट मद्य विक्रीतून दुपटी पेक्षा जास्त नफा मिळत असल्याने या अवैध दारू विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य विक्रीकडेच कल आहे. परंतु हि बनावट दारू विषासमानच असते. राज्यात वर्धा , गडचिरोली, आणि चंद्रपूर मध्ये सरसकट दारूबंदी लागू आहे. या तीनही जिल्ह्यात दारू बंदी असल्यामुळे साहजिकच अवैध दारू विक्री सुरु आहे. आणि यातूनच विषारी दारूचा प्रादुर्भाव होऊन शेकडो जण मृत्युमुखी पडले आहेत. अशाच प्रकारची घटना म्हसळा शहरात घडण्याची शक्यता आता या बनवट मद्य विक्रीमुळे बळावली आहे. वेळीच जर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क खात्याला या बनावट मद्य विक्रीला आळा बसविता आला नाही तर वर्षभरापुर्वी घडलेल्या मालाड येथील मालवणी सारखे हत्याकांड म्हसळा शहरात सुद्धा होण्यास वेळ लागणार नाही हे नक्कीच.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा