"लेकर हात मे हात चल, हिंदू मुस्लिम साथ चल" हा नारा देत म्हसळा शहरात मुस्लीम समाजाची भव्य शांती रॅली.



"लेकर हात मे हात चल, हिंदू मुस्लिम साथ चल" हा नारा देत म्हसळा शहरात मुस्लीम समाजाची भव्य शांती रॅली. देशात मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल सरकारचे लक्ष वेधले.....

म्हसळा : सुशील यादव

मुस्लिम समाजावर होणारा अन्याय ,मुस्लिम समाजाचे हक्क, मुस्लीम समाजा संदर्भात इतर धर्मीयांमध्ये असणारे गैरसमज, तसेच देशात शांतता नांदावी या संदर्भात  म्हसळा तालुका मुस्लीम समाजातर्फे आज (दि.१३ ऑग) म्हसळा शहरात एका भव्य शांती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. आज देशात मुस्लीम समाजावर विविध कारणांनी अत्याचार होत आहेत , तसेच मुस्लिमांवरील अन्यायाविरोधात कडक कारवाई साठी अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर  केंद्र सरकारने कायदा करावा हि प्रमुख मागणी सदर रॅली मध्ये दिसत होती. सदर रॅली ही अंजुमन हायस्कूल म्हसळा ते भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपापर्यंत काढण्यात आली व पेट्रोल पंपावरच रॅलीची सांगता झाली. या रॅलीच्या अनुषंगाने तताकथित गोरक्षकांची गुंडागिरी , धर्मिक स्वातंत्र्यावर आलेली गदा , कुर्बानीवर आलेली बंदी असे एक ना अनेक प्रश्न या पटलावर आणण्यात आले. या सर्व प्रश्नाकडे राज्य सरकार व केंद्र सरकार चे लक्ष वेधणे हा प्रमुख उद्देश घेऊन हि भव्य रॅली म्हसळा शहरात काढण्यात आली. मुबशीर जमादार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मुस्लीम अल्प संख्याकाना कोणतेही कारण नसताना त्रास दिला जात आहे. आम्हा मुस्लीम समाजाला या देशात शांतता नांदावी हेच वाटत आहे. हिंदू , मुस्लीम , सिख ,इसाई हम सब ही भाई-भाई हहीच शिकवण आम्ही लहान पणापासून आचरणात आणीत आहोत. म्हसळा तालुक्यात ज्याप्रमाणे हिंदू-मुस्लीम शांततेने नांदीत आहेत त्याच प्रमाणे संपूर्ण देशात अशीच एकोप्याची भावना असावी हा आमचा या शांतता रॅली मागचा प्रमुख उद्देश आहे. भारतातील राज्यकर्ते अनेक स्वातंत्र्यवीरांचा आवर्जून गौरवाने उल्लेख करतात परंतु असंख्य मुस्लीम स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख मात्र करणे टाळतात. भारत स्वतंत्र होण्यामागे मुस्लीम स्वातंत्र्यविरानी देखील आपले बलिदान दिलेले आहे हे विसरून चालणार नाही. तसेच ज्याप्रमाणे आज तालुक्यातील माझे मुस्लीम बांधव  या शांती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आले आहेत त्याच प्रमाणे परवा १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनीच्या कार्यक्रमामध्ये  देखील बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. आली कौचाली यांनी आपल्या मनोगतात केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर थेट प्रहार करताना सांगितले की या सरकारने मुस्लिमांची गळाचेपी करण्यास सुरुवात केली आहे. या देशातील प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे. आपापल्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचा अधिकार आम्हाला देशाच्या राज्यघटनेने दिलेला आहे. कोणी काय खावे कोणी काय खाऊ नये याबाबत सक्ती सरकारने करू नये.भाजप ने सत्तेत येताच राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला. परंतु केंद्र सरकार संपूर्ण देश भरातून गोमांस निर्यातीतून हजारो करोड रुपयांचा नफा कामाविते परंतु देशात राहणाऱ्या आम्हा मुस्लिमाना मात्र हेच मांस खाण्यापासून बंदी घालण्यात येते हा कुठला न्याय ? महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे परंतु भाजपचेच सरकार असलेल्या गोव्यामध्ये मात्र बंदी का नाही? असा सवाल कौचाली यांनी केंद्र सरकारला विचारला.  जर गोवंश हत्याबंदी करायची असेल तर संपूर्ण देशात करावी . पण हे भाजप सरकार असे करणार नाही , कारण गोमांस निर्यातीतून मिळणारे हजारो करोड रुपयांचा नफा याना मिळणार नाही.असे पुढे ते म्हणाले. समारोपाचे भाषण म्हसळा तालुका मुस्लीम समाजाचे अध्यक्ष अब्दुल मज्जीद झटाम यांनी केले व उपस्थित मुस्लीम कार्यकर्त्यांचे तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
 
या रॅली चे नेतृत्व म्हसळा तालुका मुस्लीम समाज अध्यक्ष अब्दुल मज्जीद झटाम, यांनी केले तर अब्दुल मुहीद मदनी, मुबश्शीर जमादार, आली कौचाली, जमीर चोगले, फारूक पेणकर, नाझीम हासवारे, फझल हल्दे, मौलाना कामरान काझी, मौलाना अब्दुल खालिक रीयाझी , रियाझ फकिह, नईम दळवी ,अक्रम साठ्विलकर,बाबाजान पठान, अस्लम चील्मायी, महमूद जमादार, शब्बीर मुर्तुझा , नफीस शाहपुरी, नसीर मिठागरे, नवीद जंजीरकर आदी मान्यवर मुस्लीम कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा