छाया : सुशील यादव
“आधीच हौस आणि त्यात पडला पाउस” म्हसळा तालुक्यात मुसळधार
पावसाने गणेशोत्सवा करिता आलेल्या चाकरमन्यांच्या उत्साहाला विरझण.
आत्तापर्यंत म्हसळ्यात तब्बल २७८५.२६ मी.मी. पाउस
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात मुसळधार पावसाने गणेशोत्सवा करिता आलेल्या
चाकरमन्यांच्या उत्साहाला अक्षरशः विरझण लागल्याचे चित्र दिसत आहे.
आत्तापर्यंत म्हसळा तालुक्यात तब्बल २७८५.२६ मी.मी. पाउस झाला आहे .
यामध्ये रविवारी(दि. २७) ६४.२० सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. हवामान
खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात कोकणात मुसळधार पाउस पडणार आहे अशी
माहिती मिळत आहे. संपूर्ण वर्षभर ज्या सणाची वाट मुंबई येथे कामानिमित्त
गेलेला चाकरमणी पहात असतो तो सण म्हणजे गणेशोत्सव. अगदी वर्ष भरात एकही
सुट्टी मिळाली नाही तरी चालेल पण शिमगा आणि गणेशोत्सव यासाठी आवर्जून
सुट्टी काढून कोकणात गावाकडे येणाऱ्या चाकरमन्याला गणपती सण यावर्षी मात्र
संपूर्ण पावसाच्या पाण्यातच साजरा कारावा लागणार आहे असेच दिसत आहे. गणपती
सणाच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाच्या संततधारी म्हसळा तालुक्यासह संपूर्ण
कोकणात सुरु आहेत. गणपती सण म्हटला की नाच , भजन , कीर्तन असे अनेक
कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु पाउस असला की इनडोर कार्यक्रम
करण्याव्यतिरिक्त पर्याय भक्त गणांपुढे उरला नाही. कार्यक्रमा साठी घातलेले
मंडप कोलमडून पडले आहेत, अंगणात संपूर्ण चिखलच चिखल आहे. यामुळे मुसळधार
पडणाऱ्या सरी पहातच सारे जण आपापल्या गावच्या घरातच बसून गणपती सण साजरा
करीत आहेत. भक्तगणांना नाच , भजन कीर्तना व्यतिरिक्त नाईलाजाने पत्ते
खेळण्याला यावर्षी जास्त पसंती द्यावी लागत आहे. यावर्षी ‘पूर्वा’ असल्याने
अनेक माहेरवाशिणी गौरी पुजनाकारीता माहेरी आलेल्या आहेत. त्यामुळे सूप,
फुले, फळे, साडी खरेदी साठी म्हसळा तालुक्यातील खेड्यातील महिलांना म्हसळा
शहरात यावे लागते. मुसळधार पावसामुळे दुर्गम भागातून शहराकडे येण्या-जाण्या
मध्ये अनेक अडचणी येत आहेत. कित्येक गावांमध्ये प्रवासा करिता एस.टी. बस
दिवसातून एखादीच असल्यामुळे बहुतेक करून खाजगी वाहने, रिक्षा यांचाच वापर
प्रवासाकरिता करण्यात येतो. परंतु आधीच खड्यात रस्ता शोधण्याचा प्रयत्न
करणारा रिक्षावाला या मुसळधार पावसामुळे या दुर्गम खेड्यांकडे जाण्यास तयार
नाही. त्यामुळे गौरी पूजनाची तयारी कशी करायची हा प्रश्न महिलांपुढे पडला
आहे. तरीही अनेक महिला पावसाला न जुमानता काही की.मी. अंतर चालून पुढे
वाहने पकडून म्हसळा शहरात खरेदी साठी येतच आहेत. त्यामुळे आपल्या गणपती
सणाची हौस , मौज भागविण्यासाठी चाकरमन्याला मोठी तारेवरची कसरत करावी लागत
आहे. म्हणूनच “आधीच हौस आणि त्यात पडला पाउस” असे हे चाकरमनी आज मिश्कीलपणे
म्हणत आहेत.


Post a Comment