शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध - आदिती तटकरे


शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध - आदिती तटकरे

प्रतिनिधी,हेमंत पयेर
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. 
आय. एस. ओ. मानांकित आदर्श मराठी शाळा खरसई येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्या असून उच्च शिक्षित शिक्षक ,विविध खेळ,स्पर्धा परीक्षा ,मूल्य शिक्षण व विविध उपक्रम ज्याद्वारे बालकांचा विकास घडवून आणला जात असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.पुढे त्या म्हणाल्या की,शिक्षण हे क्षेत्र आजच्या युगात महत्वाचे असल्याने विद्यार्थीपूरक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाईल.त्याचप्रमाणे  विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व गणवेश,मध्यान्ह भोजन,शिष्यवृत्ती,संगणक शिक्षण या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जि. प अध्यक्षा आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मान्यवरांच्या हस्ते नवगतांचे स्वागत व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.
                                             

याप्रसंगी म्हसळा सभापती उज्ज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,जि. प. सदस्य बबन मनवे, धनश्री पाटील,पंचायत समिती सदस्य संदीप चाचले, छाया म्हात्रे, खरसई सरपंच निलेश मांदाडकर,कृषी उत्त्पन्न बाजार समिती सदस्या गौरीताई पयेर, अंकुश खडस,गट विकास अधिकारी नीलम गाडे,गट शिक्षणाधिकारी साळुंखे,मुख्याध्यापिका जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना जि. प. च्या शाळेत प्रवेश घेण्याचे व शाळा प्रवेशोत्सवात सर्व लोकप्रतिनिधी ,अधिकारी व नागरिकांनी सहभागी होण्याचे  शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केलेल्या आवाहनाला म्हसळा तालुक्यातील सर्वच प्राथमिक शाळांत उत्तम प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा