तरुणांनी संधी म्हणून शेती पूरक व्यवसायाकडे पहावे.........
प्रकाश गोपाळ रायकर
शब्दांकन:- अंकुश गाणेकर
म्हसळा तालुक्यातील मौजे पाभरे चाफेवाडी येथील श्री प्रकाश रायकर हे मुंबई येथे कापड मार्केट मध्ये नोकरी करत असताना त्यांचे मालक हे स्वतः शेतकरी असल्याने त्यांच्या पासून प्रेरणा घेत,मुंबई येथील नोकरी सोडून गावाला जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. गावाला आल्यानंतर प्रथम स्वतःचा वीट भट्टी व्यवसाय सुरु केला. परंतु या व्यवसाया मध्ये स्थानिक कामगार प्रशिक्षित नसल्यामुळे बाहेरून कामगार आणावे लागत होते. कामगारांचा त्रास असल्याने सदरचा व्यवसाय बंद केला. आणि शेती व शेती पूरक व्यवसाय करण्याचा मनाशी निश्चय केला. स्वतःच्या मालकीची जेमतेम १० ते १२ गुंठे जमीन होती . ५ एकर जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन कृषी अधिकारी व स्वदेश फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच वर्षी कलिंगड लागवड केली त्यात तब्बल दोन ते अडीच लाख रुपये उत्त्पन्न मिळाले. यामुळे नव्या जोमाने अधिक पिक घेण्यासाठी १० एकर जमिनीत पुन्हा कलिंगड लागवड केली परंतु रोपांवर कडपा रोग पडल्याने हातात काहीही न पडता जेमतेम मुद्दल सुटली. मात्र हिम्मत न हरता जिद्दीने पुन्हा जोमाने कामास सुरुवात केली. आणि आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत कलिंगड लागवडी सोबतच आंतरपीक म्हणून वांगी ,मका, कारले,शिराळा,दुधी, घोसाळे व पडवळ मांडव पद्धतीने लागवड करून त्त्यांची योग्य निगा राखली व भरघोस पिक घेऊन एक ते दीड लाखांचे उत्पादन मिळाले. तसेच ५ गुंठ्यात भेंडी लागवड करून यंदा दीड लाखांचे विक्रमी नफा मिळवला .संपूर्ण शेती हि ठिबक सिंचन पद्धतीने व कलिंगड पॉलीमार्चीग मध्ये केल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचानुभव आला. सध्या G 9 पद्धतीच्या केळीची ६०० झाडांची लागवड केली असून पूर्वी आंबा ,काजू झाडांची लागवड हि केलेली आहे येत्या एक वर्षात त्यांच्या पासून चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी झेंडूच्या फुलांची लागवड करून चांगला उत्पन्न मिळवले. शेती बद्दल नव नवीन माहिती घेण्यासाठी कृषी विभागा मार्फत जाणाऱ्या सहली मध्ये भाग घेऊन घेतलेल्या माहितीचा फायदा शेती करताना होतो. कलिंगड,भेंडी ,झेंडूची फुले,यांची विक्री थेट पुणे ,वाशी मार्केट मध्ये जाऊन स्वतः केली .त्यामुळे चांगला नफा मिळाला. शेती व्यवसाय बरोबर पशुपालन ,दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतले असून यापुढे शेती बरोबर तेही व्यवसाय करण्याचा मानस आहे. शेती व्यवसाय केल्यानेच महाराष्ट्र शासनाचा व जि.प.च्या कृषी विभागा कडून मिळणारा कृषी निष्ठ पुरस्कारमिळाला याचा आनंद आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी भाताच्या पिकात न रमता कमी वेळेत जास्त उत्त्पन्न देणाऱ्या नगदी पिकांकडे लक्ष द्यावे. तालुक्यातील तरुणांनी मुंबईत नोकरी करण्यापेक्षा शेतीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करून व आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करून शेती आणि शेती पूरक नगदी पिकांची लागवड करून मुंबई सारख्या शहरात वर्षात मिळणारे उत्पन्न ३ महिन्यात शेती करून घेता येईल .
Post a Comment