सेंद्रिय शेतीमुळे परदेशी नागरिकांशी भेट – भालचंद्र अंबाजी पयेर
शब्दांकन : हेमंत भाऊ पयेर, म्हसळा
( फोटो संग्रहित )
मी जलसंपदा विभागात मजूर पदावर कार्यरत असल्याने शेतीसाठी धरणातून पाणी सोडताना पाण्याचे महत्त्व काय असते हे जवळून पहिले आहे. शेतकरी त्या पाण्याचा वापर करून स्वतःचा विकास करत होते त्यातून प्रेरणा घेत आपणही शेती करावी अस वाटत होते. नोकरीला असताना शेती करणे कस शक्य होईल का हा प्रश्न मनात रेंगाळत होता.

माझा एकत्रीत कुटुंब १५ माणसांचा असल्याने मिळणाऱ्या पगारात घर खर्च कसा भागवू शकतो अशा विचारात असताना, मी जर मुंबईसारख्या शहरात काम करत असतो तर प्रवासात वेळ निघून गेला असता नाहीतर ओव्हर टाइम करून पैसा कमावला असता पण ग्रामीण भागात पैसे कमावण्याची कोणतीच साधने नव्हती व फावळया वेळात काय करावे यावर मिळालेला उत्तम मार्ग म्हणजे शेती होय.
आपल्या जवळ वडिलोपार्जित २ एकर पेक्षा जास्त जमीन उपलब्ध असल्याची खात्री होताच कृषी विभागामार्फत विहीर खणून घेतली. विहिरीला मुबलक पाणी नसल्याने खरसई धरणाच्या विसर्गातून वाया जाणारे पाणी ग्राव्हिटीने ११०० मीटर पाईपद्वारे शेतात आणले.शेतात असलेली विहीर या पाण्याच्या माध्यमातून पुर्नभरण केली जाते .पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये यासाठी पूर्णपणे ठिबक सिंचनाचा वापर करण्याकडे माझा कटाक्ष असतो. योग्य जमीन निवडल्यावर त्या जागेत नारळ,सुपारी,जाम, पेरू, चिकू, पपई आंब्यांचे ४ ते ५ प्रकारची लागवड केली परंतु फळबागातून लवकर उत्पन्न मिळत नाही.म्हणून स्वदेश फाउंडेशन च्या माध्यमातून आंतरपीक म्हणून मांडव पद्धतीने कारळी,भोपळा, शिराळी, दुधी तसेच टोमॅटो, मिरची कोथिंबीर, गावती चहा,भेंडी व पालेभाज्यांची लागवड केली.परंतु येणाऱ्या उत्पादनाचे मार्केटिंग कसं करायचं हा प्रश्न सतावत होता पण भावाच्या पत्नीने(भावजय) वितरण व्यवस्था निर्माण केल्याने शेतमालाला योग्य भाव मिळून माल कधीही परत आला नाही.
सिद्धगिरी मठ कोल्हापूर येथे मी नियमित जात असल्याने तेथील मठाधिपती प.पु.काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या वतीने शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी या करिता विविध मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यातच मठाने विकसित केलेला सेंद्रिय शेतीवर आधारित लखपती शेतीचा मॉडेल पहिल्याने आपणही त्या पद्धतीचा अवलंब करावा असे ठरवले. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आरोग्यासाठी चांगला असून अत्यंत रुचकर असतो.यामुळे मुंबईकरांकडून या शेतमालाला मोठी मागणी आहे.येणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन करून ७० ते ८० हजारांचा नफा वर्षातील ३ ते ४ महिन्यात मिळतो . सेंद्रिय शेतीला पूरक असल्याने देशी गायींचे संगोपन करून दुग्ध व्यवसायातून वर्षाला ३० हजारांचा उत्पन्न घेतो.

कोकणात केळी पिक घेतले जात नाही अशी ओरड आहे मात्र संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने ५०० झाडांची लागवड करून यशस्वीपणे पिक घेण्याची किमया केली. शंभर टक्के सेंद्रिय शेती आणि ठिबक वापरून स्वताचा रोल मॉडेल तयार केल्याने स्वदेसच्या माध्यमातून जर्मन,अमेरिका,ऑस्ट्रेलिया, या देशातील नागरिकांनीही आमच्या शेताला भेट दिली. नोकरी सांभाळून आपण शेती करू शकतो तर पूर्णवेळ शेतीतून सहज लखपती होता येईल असा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नियमितपणे शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी प्रोत्साहित करतो.जमिनीला आपण जितके देऊ त्याच्या ४ पट पुन्हा आपल्याला देत असते,शेवटी मातीतून मोती पिकतात हेच त्रिवार सत्य आहे.
Post a Comment