म्हसळा नगरपंचायत समोरच कचऱ्याचा ढीग , कचऱ्यातच पाण्याचा स्टँड पोस्ट , नाईलाजास्तव कचऱ्याच्या ढीगाऱ्यातूनच भरावे लागते पाणी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा ग्राम पंचायत चे रुपांतर नगरपंचायत मध्ये होऊन दीड वर्ष पूर्ण झालय तरीही स्वच्छतेसारखा महत्वाचा प्रश्न नगरपंचायत प्रशासन सोडविण्यात अपयशी ठरत आहे. कन्याशाळा प्रवेशद्वारापाशी, तहसील कार्यालय पाठीमागे नेहमीच कचऱ्याचा ढीग पडलेला असतो परंतु कहर म्हणजे नगरपंचायत कार्यालयासमोरच रोज सकाळी सुका – ओला कचरा पडलेला जातो. हा काचरा जेथे असतो तेथेच नगरपंचायतचा स्टँड पोस्ट आहे. या नळातून नगरपंचायत कार्यालयाच्या आजूबाजूचे व्यापारी, हॉटेल वाले पाणी भरतात. त्याच कचऱ्यावर उनाड गुरे चरत असतात. कचऱ्याच्या ठिकाणाहून भरलेलेलं पाणी हे हॉटेल , स्वीट मार्ट च्या दुकानात नेले जाते. आधीच जल शुद्धीकरणासाठी नगरपंचायत कडे कोणतीही व्यवस्था नाही व तेच पाणी बाजाराच्या कामाकरिता तालुक्यातून आलेल्या नागरिकांना, शहरातील नागरिकाना त्या त्या हॉटेल , दुकानांमधून प्यावे लागते. हे पाणी पिऊन अतिसार , गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर यासारखे साथीचे रोग होण्याचा धोका संभवतो. आणि हे साथीचे रोग असल्यामुळे हि साथ पसरण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे नगरपंचायत एक प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशीच खेळत आहे असेच दिसत आहे. नगरपंचायत होण्याआधी ग्रामपंचायत मध्ये याच ठिकाणी जेथे स्टँड पोस्ट आहे तेथेच एक सुंदर पाणपोई बांधण्यासाठी चा ठराव सर्व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी केला होता. जेणे करून सुंदर पाणपोई कडे बघून तरी लाजेखातर या ठिकाणी कचरा टाकणारे लोक कचरा टाकणार नाहीत परंतु निधी आभावी हे काम होऊ शकले नाही. आता तर नगरपंचायत प्रशासन आहे , करही दुपटीने-तिपटीने वाढले आहेत. त्यामुळे याठिकाणी पाणपोई सारख्या माफक निधी लागणारे परंतु तितकेच महत्वाचे काम पूर्ण करून पर्यायाने येथील कचरा प्रश्न मार्गी लाऊन नगर पंचायत प्रशासन ‘स्वच्छ भारत अभियानामध्ये’ आपले योगदान देते का ? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
चौकट : लवकरच नगरपंचायत कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात येणार आहे जेणेकरून जे लोक या ठिकाणी कचरा टाकतात ते कॅमेऱ्यात कैद होतील व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि त्या जागेवर पाणपोई तयार करण्यासाठी येत्या मासिक सभेमध्ये मी स्वतः ठराव मांडेन जेणेकरून सदर पाणपोई चा वापर बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना होईल व येथे कचरा टाकणे आपोआपच बंद होईल.
संजय कर्णिक , पाणी पुरवठा सभापती, नगरपंचायत म्हसळा
छाया : सुशील़ यादव

Post a Comment