म्हसळा : सुशील यादव
शहरातील कुंभार आळी रोड परिसरात खुलेआम सुरू असलेल्या 'नाईट महाराष्ट्र' मटका जुगार अड्ड्यावर म्हसळा पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय दौलत पुरी यांनी फिर्याद दिली आहे. मौजे म्हसळा येथील कुंभार आळीकडे जाणाऱ्या रोडवर, रंजीत बारठक्के यांच्या घरासमोर आणि उदय कळस यांच्या जागेलगत हा प्रकार सुरू होता. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६:१२ वाजता पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी विनापरवाना 'नाईट महाराष्ट्र' नावाचा मटका जुगार चालवताना आढळून आले.
कारवाईत जप्त मुद्देमाल आणि आरोपींची नावे:
पोलिसांनी घटनास्थळावरून महेश घनश्याम जाधव (रा. म्हसळा बौध्दवाडी) आणि रशीद ऊर्फ काळया रफीक शेख (रा. म्हसळा दिघीरोड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटा असे एकूण १५५० रुपये रोख, तसेच जुगारासाठी लागणारे पावती पुस्तक आणि पेन असा एकूण १५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ०८/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बी.एन.एस.एस. २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एन.डी. देवडे करत आहेत.
Post a Comment