​म्हसळ्यात निवडणुकीचे बिगुल: 'गुणवत्ता' की 'आर्थिक ताकद'?

राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष
​अनेक निष्ठावंत आणि अनुभवी चेहरे रिंगणात, मात्र खर्चाच्या भीतीपोटी उमेदवारीचे पेच; नाक्या-नाक्यांवर दबक्या आवाजात चर्चा

​म्हसळा | सुशील यादव 

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा) आणि भारतीय जनता पक्ष यांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी कंबर कसली आहे. मात्र, यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरताना 'गुणवत्ता' आणि 'सामाजिक बांधिलकी' की 'आर्थिक सक्षमता', असा नवा संघर्ष पाहायला मिळत आहे.
​अनुभवी कार्यकर्त्यांची कोंडी
म्हसळा तालुक्यात अनेक इच्छुक उमेदवार हे ग्राऊंड लेव्हलवर काम करणारे, प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत. यातील अनेकांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम काम केले आहे. तरीही केवळ आर्थिक पाठबळ कमी असल्याने मुख्य राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. म्हसळा शहराच्या नाक्या-नाक्यांवर सध्या याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
​उत्पन्नाच्या स्त्रोतांचा अभाव आणि पक्षप्रमुखांची अनास्था
तालुक्यात राजकारणी आणि समाजसेवकांना निवडणूक लढवण्यासाठी लागणारा मोठा निधी उभा करता येईल, असे ठोस उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध नाहीत. त्यातच, "आमचे साहेब किंवा पक्षप्रमुख यावेळी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च करण्यास फारसा रस दाखवत नाहीत," अशी खंत काही इच्छुक उमेदवारांकडून दबक्या आवाजात व्यक्त केली जात आहे. यामुळे नाव नोंदवण्यासही अनेक जण धजावत नसल्याचे समजते.
​प्रमुख पक्षांमधील संभाव्य इच्छुक उमेदवारांची यादी:
​१. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट):
​जि.प. पाभरे गट: समीर बनकर (तालुका अध्यक्ष), महादेव पाटील (माजी सभापती), अनिल बसवत (गण अध्यक्ष), गजानन पाखड, फाहिज नजीर, लहूशेट म्हात्रे.
​पं.स. पाभरे गण (महिला राखीव): श्रीमती चाचले, श्रीमती येलवे.
​पं.स. खरसई गण: स्वप्नील बिराडी, अनंत पाटील, मोरेश्वर पायकोली, मधुकर पाटील.
​जि.प. पांगलोळी गट (सर्वसाधारण): बबन श्रीपत मनवे (माजी जि.प. सभापती), महेश शिर्के (मुंबई अध्यक्ष), संतोष उर्फ नाना सावंत (गण अध्यक्ष), अभिषेक भास्कर (दाजी) विचारे, अंकुश खडस (माजी सरपंच).
​पं.स. साळविंडे गण: मधुकर गायकर (माजी उपसभापती), महेश घोले, सतीश शिगवण, प्रसाद बोर्ले, किरण पालांडे.
​पं.स. पांगलोळी गण: श्रीमती प्रियांका प्रसन्न निंबरे (माजी सरपंच, खामगाव).
​२. शिवसेना (शिंदे गट):
​जि.प. पाभरे गट: अकमल कादिरी.
​जि.प. पांगलोळी गट: रवींद्र लाड (माजी उपसभापती).
​३. शिवसेना (उबाठा गट):
​जि.प. पाभरे गट: हेमंत अनंत नाक्ती.
​जनतेची उत्सुकता शिगेला
एकिकडे जनसंपर्क असलेले कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे निवडणुकीचा अवाढव्य खर्च. अशा परिस्थितीत पक्षप्रमुख निष्ठेला आणि कामाला महत्त्व देतात की आर्थिक सक्षमतेला, यावर म्हसळ्याच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. आता कोणत्या पक्षाचा झेंडा कोणाच्या हाती जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा