खरसई गावातील युवा क्रिकेटपटू सार्थक खोतला नगरसेविका राखीताई करंबे यांच्याकडून क्रिकेट साहित्याची भेट

म्हसळा: तालुक्यातील खेळाडूंना शालेय स्पर्धा आणि असोसिएशनच्या माध्यमातून कबड्डी, योगासन, आर्चरी, क्रिकेट, कराटे इत्यादी खेळात सहभाग घेण्याची संधी मिळते. मात्र, त्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्यास ते जिल्हा आणि राज्यस्तरावर उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहतात.

अशाच प्रकारे म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील कुमार सार्थक कृष्णा खोत हा १६ वर्षांखालील क्रिकेट गटात सध्या माणगाव क्रिकेट क्लबमध्ये सराव करत आहे. क्लबचे प्रशिक्षक संजय गमरे सर त्याला क्रिकेटचे मार्गदर्शन करत आहेत. सार्थकला त्याच्या सरावासाठी क्रिकेट साहित्याची आवश्यकता होती. या गरजेला प्रतिसाद देत म्हसळा नगरपंचायतीच्या नगरसेविका मा.सौ. राखीताई करंबे यांनी सार्थकला क्रिकेट किट भेट दिला.

सामान्य कुटुंबातील सार्थक खोतसाठी ही भेट बहुमोल सहकार्य ठरली असून त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. या कार्यक्रमावेळी अजय करंबे, नगरसेविका राखीताई करंबे, तसेच खोत परिवारातील सदस्य उपस्थित होते. सार्थक खोतचे पुढील ध्येय माणगाव क्रिकेट क्लबकडून खेळून रायगड जिल्हा क्रिकेट संघात पदार्पण करणे आहे.

सार्वजनिक ठिकाणी, क्रिकेट साहित्य किट देऊन खेळाडूला प्रोत्साहन दिल्याबद्दल खोत परिवाराने राखीताई करंबे यांचे मनःपूर्वक आभार मानले. राखीताई करंबे यांनी सार्थक खोतला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, तालुक्यातील युवा खेळाडू स्पर्धेत नाव उंचावतील, असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा