वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा: म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यात अपुरी हॉस्पिटल सुविधा यमराजाचा चेहरा?

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचा विषय बनले आहेत. या मार्गावर वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे गमावलेले जीव स्थानिकांसाठी मोठी समस्या ठरले आहेत. या मृत्यूंमागे अपघातानंतरच्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा गंभीर प्रश्न उभा राहतो. राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असताना देखील या भागात एकही उत्तम हॉस्पिटल नसणे ही बाब खेदजनक आहे.

अपघात झाल्यानंतर जखमींना वेळेत तात्काळ उपचार मिळत नसल्याने अनेक प्रकरणांत रुग्णांचे प्राण वाचवणे कठीण ठरते. भागातील रुग्णालयांमध्ये तातडीच्या आणि अद्ययावत उपचार सेवा अपुऱ्या आहेत. जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर रुग्णांना सेवा देण्याचे साधन नाही, त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय किंवा मोठ्या शहरातील रुग्णालयात हलवावे लागते. रुग्णवाहिकेची व्यवस्था आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे उपचारात होणारा विलंब मृत्यूच्या कारणांपैकी एक ठरतो.

याशिवाय, अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षेच्या नियमांवरही कठोरपणे पालन करण्याची गरज आहे. दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट घालण्याची प्रवृत्ती कमी असल्याने, अपघातात झालेल्या दुखापती प्राणघातक ठरतात. हेल्मेट वापर सक्तीने राबवली पाहिजे आणि याबाबत जनजागृती वाढवली पाहिजे. प्रशासनाने हेल्मेट वापराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

रस्ते सुरक्षेत सुधारणा, उत्तम वैद्यकीय सुविधा आणि अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळवून देण्याची व्यवस्था केल्यास अनेक जीव वाचू शकतील. हा विषय गांभीर्याने घेतल्यास पुढील अपघातांतील मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा