संदिप नाईक प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 1 लाखाचा निधी जाहीर
टीम म्हसळा लाईव्ह
या धावत्या इंटरनेटच्या आधुनिक काळात जर आपल्याला टिकायचे असेल तर आपल्याला आपला योग्य मार्ग निवडता आला पाहिजे व उद्याचे भविष्य जर का एकनिष्ठ, एकरूप, एकात्मतेने टिकवून ठेवायचे असेल तर आजचे युवक-विद्यार्थी हे आदर्श यशस्वी घडले पाहिजेत. यासाठी खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवित करून त्यांना करियरची योग्य दिशा ओळखता यावी यासाठी अनुभवांच्या शिदोरीमध्ये तज्ञ उद्योजक, सामाजिक व शैक्षणिक विकास असे नामांकित यशस्वी व्यक्तिमत्त्व यांचे व्याख्याते म्हणून मार्गदर्शक लाभले. खरसई येथील युवक युवती व विध्यार्थी यांचा शैक्षणिक, सामाजिक, संस्कारिक असा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी उपरोक्त समाज मंडळाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो आणि याही वर्षी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वी च्या प्रथम श्रेणी तसेच, पदवीधर व इतर उच्च शिक्षण क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी कै. वत्सलाबाई रामा भगत, शाळा क्र. ०९, सेक्टर १६-ए, नेरुळ, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. परशुराम भांजी माळी खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई (रजि.) अध्यक्ष, प्रमुख अतिथी सन्माननीय श्री संदीपजी गणेश नाईक, भाजपा मा. आमदार आणि जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई, श्री. गणेशजी हाल्या भगत, भाजपा - चिटणीस, नवी मुंबई, श्री. गिरीशजी कान्हा म्हात्रे भाजपा - मा. नगरसेवक, प्रभाग क्र. ९५, नेरुळ, नवी मुंबई, श्री. संजयदादा मधुकर ठाकुर समाजसेवक - नेरुळ, नवी मुंबई, राजुजी दत्तु तिकोणे भाजपा - तालुका अध्यक्ष, नेरुळ, नवी मुंबई वर संस्थचे सभासद, ग्रामस्थ आणि विध्यार्थी मित्र उपस्थित होते.
खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळाचे नवी मुंबईत भवन असावे व त्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत नाईक परिवार करणार असल्याचे त्यांची जाहीर केले. तसेच विध्यार्थी मित्रांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी विध्यार्थ्यांना प्रोत्साहित केले तसेच खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळाच्या कार्याची दखल घेत संदीप नाईक प्रतिष्ठान तर्फे 1 लाख रुपयांचा निधी विध्यार्थ्यांसाठी जाहीर केला.
सदर कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडवा यासाठी ग्रामस्थ व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोज लक्ष्मण माळी यांनी केले.
Post a Comment