म्हसळा : प्रतिनिधी
संत निरंकारी मिशनच्या झोन खरसई 40-अ रायगड ब्रँच संदेरीच्या वतीने कुणबी समाजगृह संदेरी येथे रविवारी ऐन दिवाळीच्या दिवशी आयोजित केलेले रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 53 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबीर खरसई (रायगड) 40-अ चे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी संदेरी ग्रामपंचायत सरपंच शुभांगी पाष्टे, उपसरपंच मकबूल कारविणकर व सर्व सदस्य यांची विशेष उपस्थिती होती. शासकीय रक्तपेढी अलिबाग-रायगड, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी व त्यांची टीम यांच्या माध्यमातुन रक्त संकलित करण्यात आले.
उदघाटन प्रसंगी झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले, की संत निरंकारी मिशन हे निराकार ईश्वराचे ज्ञान देणारे मिशन आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, फ्री मेडिकल कँप, वननेस वन सारखे सामाजिक उपक्रम राबवणे एवढीच संत निरंकारी मिशनची ओळख नाही. तर, समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्याकडून निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यावर मनुष्य जीवनात ईश्वराची भक्ती सुरू होते व ती मोक्ष मुक्तीसाठी साधन बनते, या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला.
मानवमात्राच्या सेवेसाठी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. संत निरंकारी मिशन अध्यात्मिक जनजागृती बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. असे प्रास्ताविकमध्ये प्रसाद पारावे यांनी व्यक्त केले. तर डॉ. दीपक गोसावी यांनी संत निरंकारी मिशनची प्रशंसा करताना म्हणाले, रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना संत निरंकारी मिशनच्या वतीने वेळोवेळी रक्तदान शिबीर राबवून मोलाचे योगदान देत आहे.
संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला 23 ऑक्टोबर 1986 पासून सुरू झाली आहे. दरवर्षी 24 एप्रिल मानव एकता दिवस या दिवसापासून संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. वर्षभरात रायगड झोन अंतर्गत सर्व ब्रँच दरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रथमच संदेरी ब्रँच मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे संदेरी ब्रॅंच मुखी सुरेश पवार यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र तसेच मान्यवरांचे निरंकारी मंडळाचे प्रकाशन साहित्य व पुष्पगुछ देऊन संत निरंकारी मिशन कडून आभार मानण्यात आले.
Post a Comment