dandguri: दांडगुरी नागलोली वरवटणे रस्ता अद्यापही उपेक्षित ; खासदारांच्या हस्ते भूमिपूजन होऊन नऊ वर्षांपासून रस्त्याला प्रतिक्षा डांबरीकरणाची.


श्रीवर्धन(समीर रिसबूड)-श्रीवर्धन तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातंर्गत कामांचे नियतवाटप आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुर्नवसन विभागातील शासन निर्णय कामातंर्गत होत असलेल्या निधी संदर्भात चौकाचौकात फलक लावण्यात आले आहेत.फलकावर तालुक्यात सतरा ठिकाणी होत असलेल्या विकासकामांची यादी प्रसिद्ध केली असून रुपये तीनशे चौदा कोटी त्रेपन्न लाख अठ्ठयाण्णव हजार इतक्या खर्चाचा उल्लेख केला आहे.

         रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कडून सध्या श्रीवर्धन तालुक्यात होत असलेल्या सभा,भूमिपूजन सोहळा अथवा लोकार्पण सोहळा दरम्यान तालुक्यातील होत असलेली किंवा झालेल्या विकासकामां बाबतीत वारंवार उल्लेख करीत भविष्यातही विकासकामे,रस्ते या कामांसाठी निधी उपलब्ध केला जाईल असे आश्वासन दिले जाते.परंतु गुरुवार ३० जानेवारी २०१४ रोजी खा.सुनील तटकरे हे जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या हस्ते दांडगुरी नागलोली वरवटणे या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता.आजच्या घडीला भूमिपूजन सोहळा संपन्न होऊन नऊ वर्षे पुर्ण झाली पण रस्ता अद्यापही दुरावस्थेतच आहे.

         ३०५४ रस्ते व पुल विशेष दुरुस्ती अंतर्गत दांडगुरी नागलोली वरवटणे रस्ता इजिमा ७.४०० किलोमीटर ६/५०० ते ९/५०० मध्ये एमपीएम कारपेट सिलकोट सह करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते २०१४ साली संपन्न झाला होता.या कारपेट सिलकोट रस्त्यामुळे दांडगुरी ते म्हसळा या मार्गावरील वावे पंचतन, बोर्ला, देवखोल, नागलोली, धनगरमलई, कासारकोंड, साळविंदे व वरवटणे या खेडेगावांसह आजुबाजुच्या वाड्यांना फायदा होणार आहे. अद्याप ह्या रस्त्यावर कारपेट सिलकोट राहिले बाजूला साधी खडी व डांबराचा एकही थर न पडल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय रस्त्यावर प्रवासी वाहने कुठलाही चालक नेण्यास तयार होत नसल्याने सदरच्या खेडेगावातील रहिवाशांची अनेकदा गैरसोय होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष दर्शन विचारे ह्यांचे मुळगाव ही नागलोली. जेव्हा दांडगुरी नागलोली वरवटणे या रस्त्याचे भूमिपूजन झाले तेव्हा दर्शन विचारे हे तालुकाध्यक्ष होते. परंतु नऊ वर्षात दर्शन विचारे यांनीही सदरच्या रस्त्या बाबतीत तालुकाध्यक्ष या नात्याने खासदारांची चर्चा करीत सदरच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले नाही. या बद्दल तालुकाध्यक्षांच्या बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा