श्रीवर्धन तहसील कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न.


श्रीवर्धन - संतोष चौकर)
आगामी येणाऱ्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेपे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गणेश उत्सव काळात मुख्य करून मुद्दा असतो तो महावितरणचा. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बोरसे यांनी यावेळी आमच्याकडून यावेळी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून वीज पुरवठा वारंवार खंडित होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार लुंगे यांनी देखील तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्तीची कामे त्याचप्रमाणे खड्डे भरणे ही सर्व कामे गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी अमोल नापते यांनी नगरपरिषदेकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनांची व समुद्रकिनाऱ्यावरती विसर्जन काळामध्ये ध्वनीक्षेपक व लाईटची व्यवस्था करण्याबाबत माहिती दिली.तसेच निर्माल्य जमा करण्यासाठी नगरपरिषदेने व्यवस्था केली असल्याचे सांगितले. श्रीवर्धन परिवहन आगाराचे आगार व्यवस्थापक मेहबूब मणियार यांनी श्रीवर्धन येथून गणेशोत्सवासाठी सुटणाऱ्या ज्यादा गाड्यांबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे रेल्वेने आलेल्या प्रवासी वर्गासाठी लोकल माणगाव ते श्रीवर्धन बसेसची माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना कोणीही सोशल मीडिया वरून अफवा पसरवत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी देखील श्रीवर्धन शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत उपस्थित सदस्यांना माहिती दिली. तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी सर्व गणेश भक्तांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे व प्रशासनाला योग्य वेळी सहकार्य करावे. असे आवाहन करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा