सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे हस्ते संत निरंकारी आरोग्य केंद्राचे उद्घाटन

 




दिल्ली, 20 जून, 2023: संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत निरंकारी कॉलनी, दिल्ली येथे चालवल्या जाणाऱ्या संत निरंकारी आरोग्य केंद्राचे उद्घाटन  सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. संत निरंकारी मिशन मानवी कल्याणासाठी नेहमीच अग्रेसर असून मिशनचे  ध्येय आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याण यांना प्रोत्साहन देणे आहे. या मोहिमेत मिशन सातत्याने कार्यरत आहे.

संत निरंकारी मिशनचे सचिव श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, संत निरंकारी हेल्थ सेंटर १९७५ मध्ये डॉ. अमरनाथ जी यांनी सुरू केले होते. तेव्हापासून आतापर्यंत या आरोग्य केंद्राचा लाखों लोकांनी लाभ घेतला आहे. सध्या याचे नूतनीकरण करून रूग्णांवर योग्य आणि उत्तम उपचार करता यावेत यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी आपल्या पवित्र प्रवचनात सांगितले की, निरंकारी दवाखान्याची सेवा, जी इतकी वर्षे सर्वांना लाभत होती, ती सेवा आता निरंकारी हेल्थ सेंटर च्या नावाने ओळखली जाईल, ज्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सद्गुरू माता जी यांनी सांगितले की, या केंद्रात जो कोणी येईल, त्याने निरंकार प्रभू परमात्म्याने दिलेल्या या देहाची काळजी घ्यावी, या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेऊन निरोगी घरी परत जावे. सद्गुरू माताजी पुढे म्हणाल्या की, जेव्हा आपण निरंकाराला प्राधान्य देतो, तेव्हा आपण स्वतः सेवा आणि नामस्मरणाच्या भावनेने जोडले जातो, तेव्हा आपले जीवन खर्‍या अर्थाने भक्तिमय होऊन जाते आणि प्रत्येकामध्ये या निरंकार परमात्म्याचे दर्शन घेत आपण सेवेची भावना मनात रुजवतो.
         
संत निरंकारी आरोग्य केंद्राचे संपूर्ण काम तज्ञ वैद्यकीय संचालक डॉ. गीतिका दुग्गल यांच्याकडे सोपविण्यात आले असून , याच्या सोबतच अनेक वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेले समन्वयक डॉ. नरेश अरोरा हे देखील आपली सेवा तत्परतेने पार पाडत आहेत. विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा जसे अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे, ई.सी.जी. रुग्णांसाठी प्रयोगशाळा, पॅथॉलॉजी, ऑपरेशन थिएटर, नेत्र चिकित्सा केंद्र, दंत केंद्र, होमिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच सर्जन, अल्ट्रासाऊंड, बालरोगतज्ञ, त्वचा विशेषज्ञ, ई.एन.टी .विशेषज्ञ असे प्रशिक्षित स्पेशालिस्ट, ऑर्थोपेडिक, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतवैद्य, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन आदी तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध असतील. चाचण्या आणि औषधेही आरोग्य केंद्रात धर्मादाय दराने उपलब्ध असतील. स्थानिक रहिवाशांव्यतिरिक्त या सर्व सुविधांचा लाभ जवळपास राहणाऱ्या सर्व शहरवासीयांना मिळेल. संत निरंकारी आरोग्य केंद्र पूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले आहे. केंद्रात रुग्णांसाठी 10 खाटांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


निरंकारी हेल्थ सेंटर उघडण्याची वेळ सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 आणि त्यानंतर दुपारी 2.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत असेल. या केंद्रात रुग्णांसाठी 24 तास आपत्कालीन सुविधाही उपलब्ध असणार असून, त्याअंतर्गत रुग्णांना दाखल करण्यासोबतच मोफत रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. निश्चितच, मिशन वेळोवेळी लोककल्याणासाठी अनेक सेवा करत आहे, जे समाजाच्या उन्नतीसाठी एक अर्थपूर्ण पाऊल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा