खरसई : प्रसाद पारावे
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपूर्ण भारतवर्षातील विविध भागांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या शाखांमध्ये, मोकळ्या जागेत तसेच उद्यानांमध्ये आयोजित केला गेला, त्या अनुषंगाने झोन रायगड 40-A अंतर्गत 20 ब्रँचमध्ये शेकडो भक्तगणांनी सहभाग घेतला. त्यामध्ये खरसई मधील संत निरंकारी सत्संग भवन  येथे योगा प्रशिक्षक निशा पाटिल, दिव्या खोत, कृतिका पयेर यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिवस संपन्न झाला. 
मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सन 2015 पासूनच योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात करण्यात आले होते. संत निरंकारी सत्संग भवन खरसई येथे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांच्यासह खरसई ब्रँच मधील भक्तगण व यु.नं. 895 खरसई सेवादल अधिकारी  व सेवादल सहभागी झाले होते. 
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अनेकदा आपल्या विचारांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच आपल्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याची प्रेरणा देत असतात. या योग दिवसाचा उद्देशही हाच होता, की सर्वांमध्ये एकाग्रता आणि सामुदायिक सामंजस्याच्या भावनेचा संचार व्हावा, ज्यायोगे हे जीवन आणखी सुंदर व उत्तम रीतीने जगता येईल. वर्तमान समयाला तनावपूर्ण व नकारात्मक विचारांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडत आहे. अशा वेळी ईश्वराने जे हे मनुष्य तन आपल्याला दिलेले आहे त्याचा सांभाळ योगाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानेंद्रियांना जागृत करुन आध्यात्मिकतेने युक्त जीवन जगता येऊ शकते.
योग ही प्राचीन भारतीय परंपरेची अमूल्य देणगी आहे. मन आणि शरीर यांच्या एकतेचे ते प्रतीक आहे. योग हा केवळ व्यायाम नाही तर तो सकारात्मक भावना जागृत करुन तनावमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देतो. योगाद्वारे आपली जीवनशैली सहज व सक्रिय करुन स्वस्थ जीवन जगता येते. वर्तमान काळात तनावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाची नितांत गरज आहे. आज ही संस्कृती संपूर्ण विश्वातील जवळपास सर्व देशांकडून अंगीकारली जात आहे.
 
 
 
  
Post a Comment