भक्त पुंडलिक संस्थानाला दिला जाणार चांदीचा रथ
मुंबई | समाजमनाची दुरुस्ती आणि सुशिक्षित, सुसंस्कृत मनाने माणसं एकत्र राहण्याची मानवतावादी शिकवण देणाऱ्या वारकरी संत परंपरेचे दहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हॉटेल नोव्हाटेल ईमॅजिका, सांगडेवाडी, खालापूर जि. रायगड येथे २२ व २३ जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनादरम्यान साधुपरंपरा व संत परंपरा त्याचबरोबर संत नामदेवांची सामाजिक भूमिका व महिला संतपरंपरा अशा प्रमुख विषयांवर परिसंवाद होणार आहेत, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी संत साहित्य संमेलन घेतले जाते. यावर्षी हे संमेलन रायगड जिल्ह्यातील खोपोलीत होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे आहे. तसेच संमेलनाध्यक्षपद ह. भ. प. आचार्य बाळासाहेब महाराज देहूकर भूषविणार आहेत. संमेलनाच्या सांगता समारंभाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन दिवसीय कार्यक्रमात प्रशासनातील संत परंपरेला मानणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहून परिसंवादात सहभागही घेणार आहेत. राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेध सिंगल, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अन्य सनदी अधिकारी सहभागी होणार आहेत. राज्याच्या कारभाराला दिशा देण्याची जबाबदारी असणारे प्रशासनातील कर्तेधर्ते अधिकारी या संमेलनात प्रबोधन करणार आहेत.
यावेळी आपल्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची भूमिका रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचाही सन्मान केला जाणार आहे.
कोरोनामुळे माणसं माणसांपासून दूर गेली असताना व सर्वत्र एक अनामिक नकारात्मक वातावरण असताना संत संमेलनाचा हा सामाजिक सोहळा होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे सर्व नियम पाळून व कायद्याच्या चौकटीत हे संमेलन पार पडणार आहे.
आई-वडिलांच्या सेवेचं प्रतिक म्हणून भक्त पुंडलिकाकडे पाहिलं जातं. त्यामुळे ही विचारधारा जनमानसात रुजविणाऱ्या भक्त पुंडलिक संस्थानाला चांदीचा रथ या संमेलनात देण्यात येणार आहे. ज्या पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात ईश्वरी शक्ती भूतलावर आली त्या विचारांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे.-विठ्ठल पाटील, अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद
Post a Comment