गाळमुक्त नद्यांसाठी दिलेल्या निवेदनाला नानाभाऊ पटोले यांचा सत्कारात्मक प्रतिसाद




काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या निवेदनाची दखल

चिपळूण (ओंकार रेळेकर)
चिपळूणच्या नद्या गाळमुक्त करण्यासाठी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी केलेल्या पाठपुराव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना नियोजनबद्ध पद्धतीने गाळ काढण्याचा शासकीय अध्यादेश काढावा तसेच पुरेशी आर्थिक तरतूद करावी, अशी शिफारस केली. श्री. यादव यांनी यासंदर्भात पाठपुरावा करताना मा. नानाभाऊ पटोले साहेबांना स्वतंत्र निवेदन तसेच चिपळूण बचाव समितीच्या मागण्यांचे निवेदनही पाठवले होते.
       चिपळूणमधील नद्या गाळमुक्त व्हाव्यात आणि निळी-लाल पूररेषा स्थगित करावी, अशी मागणी करत चिपळूण बचाव समितीने साखळी उपोषण सुरू केले होते. त्यासंदर्भात चिपळूण बचाव समितीच्या वतीने चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. प्रशांत यादव साहेबांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेऊन श्री. यादव यांनी यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांना निवेदन पाठवले होते. तसेच सोबत चिपळूण बचाव समितीच्या मागण्यांचे निवेदनही सादर केले होते. या निवेदनाची मा. पटोले साहेबांनी दखल घेऊन 22 डिसेंबर 2021 रोजी मा. ना. जयंत पाटील यांना पत्र पाठवून यासंदर्भात चिपळूणच्या नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबतचे आदेश व्हावेत, अशी शिफारस केली होती. या शिफारस पत्राची प्रत मा. नानाभाऊ पटोले यांच्या कार्यालयातून मा. प्रशांत यादव यांना पाठवण्यात आली आहे.
       चिपळूणच्या नद्या आणि उपनद्या पूर्णपणे गाळमुक्त व्हाव्यात आणि चिपळूणकरांची महापुराच्या संकटातून कायमची मुक्ती व्हावी, यासाठी श्री. प्रशांत यादव साहेब गेले अनेक दिवस प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. चिपळूण बचाव समितीच्या सदस्यांनीही त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यातच मा. नानाभाऊ पटोले यांच्याकडे श्री. यादव साहेबांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेण्यात आल्याने श्री. यादव यांचे अनेकांनी अभिनंदन केले.


पूरमुक्त चिपळूणसाठी प्रयत्नशील : प्रशांत यादव
चिपळूणच्या नद्या आणि उपनद्यांमधील गाळ पूर्णपणे काढला जावा आणि चिपळूण महापुरातून कायमचे मुक्त व्हावे, यासाठी चिपळूण तालुका काँग्रेस प्रयत्नशील आहे. जिल्हाध्यक्ष मा. अविनाशजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेब यांच्या माध्यमातून चिपळूणकरांची ही समस्या सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया मा. प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा