● प्रशासनाचे दुर्लक्ष, शेती नापीक होण्याची भीती, शेतकरी चिंतेत
● शेतकऱ्यांवर कोसळलं आर्थिक संकट
म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा सावित्री किनारपट्टीवर असणाऱ्या खारगाव लिपनिवावे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतात खार पाणी शिरल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या शेती नजदीक बांधण्यात आलेल्या खारभूमीलगतच्या शेतबंधाऱ्याचा काहीसा भाग फुटल्याने हा प्रकार घडल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिली. प्रशासनाचे या बंधाऱ्यांकडे झालेले दुर्लक्ष यास कारणीभूत असून येथील भातशेतीसह नुकत्याच लावण्यात आलेल्या कडधान्य पिकांची देखील या पाण्यात अक्षरशः नासाडी झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी बॅ.ए.आर.अंतुले यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात या खारभूमी लगत असणाऱ्या शेतीच्या सुरक्षिततेकरिता हे बंधारे बांधले होते मात्र कालांतराने प्रशासनाने बंधाऱ्याच्या डाकडुजीकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाऱ्यांचा बराचसा भाग ढासळल्याने शेतकऱ्यांच्या शेतात सावित्री नदीचे खारे पाणी शिरत असून अशा संकटांना आता येथील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन याची झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
40 वर्षापूर्वी बांधलेल्या आंबेत खाडीवरील बंधाऱ्याला भगदाड पडल्याने म्हसळा तालुक्यातील तीनशे एकर जमिनीचे अक्षरश: मिठागर झाले आहे. या परिसरातील सहा गावांमधील शेत जमिनी मध्ये खारे पाणी घुसल्याने वाल, पावटा तसेच तुरीच्या शेतीचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे पिकत्या जमिनी नापीक झाल्या असून भविष्यात भातशेती सह अन्य पिके घ्यायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आधीच कोरोना महामारीच्या संकटाने आर्थिक गणित बिघडले असताना आता हक्काची शेती खाडीत बुडाल्याने मोठे संकट ओढवले आहे. आंबेत खाडीला जाऊन मिळणाऱ्या सावित्री नदीच्या किनार्यावर लिपणीवावे, खारगाव, लिपणीवावे मोहल्ला, बौद्धवाडी, आमशेत अशी सहा गावे वसली आहेत. भरतीच्या वेळी आंबेत खाडीतील पाणी थेट येथील शेतीमध्ये घुसत असल्याने तत्कालीन सरकारने चाळीस वर्षांपूर्वी आंबेत लिपणीवावे या बारा किलोमीटरच्या पट्ट्यात अनेक लहान मोठे बंधारे बांधले आहेत. त्यातीलच लिपणीवावे ते खारगाव हा एक किमी लांबीचा व पाच फूट उंचीचा बंधारा बांधला होता. माती व वरून दगडांचे पिचिंग असलेल्या या बंधाऱ्यामुळे 6 गावातील शेती सुरक्षित होती मात्र खारभूमी व पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षापासून दुरुस्ती अभावी या बंधाऱ्यांची दुरवस्था झालेली होती. यावर्षी आलेल्या पुरात पिचिंग केलेले दगड ढासळले होते त्यामुळे नुकत्याच आलेल्या भरतीच्या तडाख्यात या बंधाऱ्याला भलेमोठे भगदाड पडून खाडीचे पाणी थेट तीनशे एकर शेती मध्ये घुसले आहे त्यामुळे भात शेती नंतर लावलेला पावटा, हरभरा, मूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या पत्रांना केराची टोपली ..
दुरुस्तीअभावी तीन वर्षांपूर्वी या बंधाऱ्याचे पिचिंग ढासलेले होते. याबाबत शेकडो गावकऱ्यांनी एकत्र येऊन खारभूमी तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आणि लिपणीवावे बंधार्याचे डागडुजी करण्याची मागणी केली होती मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होते. अनेकदा दिलेल्या पत्रांना निधीचे कारण देऊन केराची टोपली दाखवली गेली त्यामुळेच हा बंधारा फुटला असून याला प्रशासन जबाबदार आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
"खारगाव - लिपणीवावे हद्दीतील खारभूमी लगतच्या बंधाऱ्याच्या डागडुजी व सुरक्षिततेबाबत संबंधित प्रशासन वर्गाला, लघुपाटबंधारे, खारभूमी लँड विभाग, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी असे सर्वांना लेखी पत्रव्यवहार करून झालेले आहेत. असे असूनही या गंभीर समस्येकडे सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रसंग ओढवला आहे. अनेकांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता लवकरात लवकर बंधारे दुरुस्त करून मिळावेत नाहीतर या भागातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभे केले जाईल.श्री.आकाश मोरे, उपसरपंच - ग्रामपंचायत लिपणीवावे - खारगाव
खारगाव- लिपणीवावे परिसरात अचानक सावित्री नदीचे खारे पाणी शिरल्याने झालेले नुकसान
Post a Comment