मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी विठ्ठल उमपांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह व मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन केले जाते. या संगीत समारोहा मध्ये दिग्गज कलाकारांची वर्णी लागते. त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यंदा २०२० व २०२१ असे संयुक्तिक पुरस्कार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे दिले जाणार आहेत. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे (cm uddhav thackeray) उपस्थित राहणार आहेत. आज या पुरस्कारांची घोषणा नंदेश विठ्ठल उमप, अध्यक्ष - विठ्ठल उमप फाऊंडेशन यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेमध्ये केली. २०२० आणि २०२१ या वर्षांसाठी प्रत्येकी ६ पुरस्कार ची नावे जाहीर करण्यात आली. एकंदरीत १२ पुरस्कार दिले जाणार आहेत.
विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक महेश काळे करणार आहेत, तर प्रबोधनात्मक भजन श्री सत्यपाल महाराज सादर करणार आहेत, हे या कार्यक्रमाचं आकर्षण आहे.
२०२० चे पुरस्कार मूर्ती :-
माया जाधव - जीवन गौरव, प्रेमानंद गज्वी - लेखक व साहित्यिक, प्रशांत दामले - अभिनेता व निर्माता, अशोक वायंगणकर - सामाजिक क्षेत्र, प्राजक्ता कोळी - नवोन्मेष प्रतिभा
२०२१ चे पुरस्कार मूर्ती :-
जयंत सावरकर - जीवन गौरव, डॉ. विजया वाड - साहित्यिक व लेखिका, राजेश टोपे (आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य) - सामाजिक क्षेत्र, उत्तरा केळकर - संगीत क्षेत्र, सत्यपाल महाराज चिंचोळकर - लोककला, ओम राऊत - नवोन्मेष प्रतिभा
कोरोनाचे नियम पाळून विठ्ठल उमपांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह व मृदगंध पुरस्काराचे आयोजन केले जाणार आहे.
WEB Title - Announcement of Vitthal Ump Foundation's "Mridgandh" Awards
Post a Comment